'मेळघाटच्या कविता'
आज श्रीकृष्ण राऊत यांच्या ' मेळघाटच्या कविता' या संग्रहाचे प्रकाशन पुसद येथे कादंबरीकार दिनकर दाभाडे यांचे शुभ हस्ते श्री वैराळकर यांच्या गझल मुशायरा या गझल मैफिलीअंतर्गत होत आहे ।श्रीकृष्ण राऊत हे कवितेपेक्षा गझल या प्रकारात अधिक ओळखले जाणारे गझलकार। तसेच अभंगांवरही त्यांचं तेवढंच प्रभुत्व आहे। मेळघाटातील कोरकू आदिवासींच्या जीवनाचा ,त्यांच्या संस्कृतीचा जवळून परिचय करून घेऊन त्यावर कविता लिहिण्याचा त्यांच्या मनात विचार येणे ही फार मोठी गोष्ट आहे ।वास्तविक मेळघाटच्या अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या कोरकू आदिवासींपर्यंत शारीरिक दृष्ट्या सक्षम ,धडधाकड माणसास सहजपणे पोहोचणे अशक्य असते।मात्र शारीरिक दृष्ट्या अक्षम असूनही ते मेळघाटच्या अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या कोरकू या जमातीच्या माणसांपर्यंत पोचले असे नाही तर त्यांच्या अंतरंगात ही त्यांनी सहृदयतेने प्रवेश केला याची साक्ष यांच्या या कविता संग्रहातून स्पष्टपणे दिसून येते ।मेळघाटची लोकमाता म्हणून सिपना नदीचा उल्लेख गौरवाने केला जातो। सिपनेने मेळघाटच्या कोरकूंचे जीवनयापण आपल्या उबदार मायेने व्यापलेले आहे ।आपल्या 'सिपना व माय' या कवितेत राऊत ही बाब आवर्जून मांडतात ।ते म्हणतात-
सिपना वो माय,
तुझ्या लेकी साध्याभोळ्या;
हांडोर भरून
देई चांदीच्या मासोळ्या.
सिपना वो माय,
लेक तुझ्या मागं हिंडे;
कराड भरून
देई सोन्याचे खेकडे.
सिपना वो माय,
तुह्या डोहात कपारी ;
जीवाला विसावा
भर वैशाखी दुपारी .
सिपना वो माय ,
लेक डुंबली न्हाण्याला ;
लुगडं वाळणे-
फुटे पदर पाण्याला.
सिपना वो माय,
पाणी वाघाला दे पिऊ;
गरवार गाय
त्याला दिसू नको देऊ.
कोरकू आदिवासींच्या अनघड पारंपारिक अशा उदात्त लोकसंस्कृतीचे ही कविता शब्दाशब्दांतून दर्शन घडविते ।ही कविता वाचताना आपण मेळघाटच्या कडेकपारीतून हिंडत आहोत असे सातत्याने जाणवत राहते। ही या कवितेची खरी ताकद आहे ।
या कवितासंग्रहाच्या प्रकाशनास माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
(सदर फोटो सौ .अरूणाने काढलेला तिच्या आयुष्यातला पहिला फोटो ।ही तिच्या जीवनातली एक क्रांतीच ।)
फेसबुक / १ मे २०२२

No comments:
Post a Comment