मोहात पाडणाऱ्या 'मेळघाटाच्या कविता '
■■■
● प्रभाकर पवार, कल्याण
.
आज पुसद येथे होणाऱ्या
'गझलरंग ' मुशायऱ्यात
पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या 'मेळघाटच्या कविता ' ह्या दर्जेदार कवितासंग्रहाचे
प्रकाशन प्रसिद्ध कादंबरीकार दिनकर दाभाडे यांचे हस्ते होत आहे.
त्या निमित्ताने त्या पुस्तकाचा हा अल्पसा परिचय.
.................................
मेळघाट एक पर्यटनक्षेत्र, मेळघाट म्हणजे चाळीस वर्षाहून जुना व्याघ्र प्रकल्प आहे. तेथे निसर्ग मुक्तहस्ताने आपल्या साैंदर्याची उधळण करत असतो. केसरी व लाल रंगाचा दुर्मिळ पळस तेथे फुलतो. हेच चित्र आम्हाला गुगलवर किंवा सोशल मिडियाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते.
परंतु पडद्या मागची बातमी काही औरच आहे. या मेळघाटाच्या पडद्यामागे भाकरीसाठी संघर्ष करणारा एक वर्ग आहे. त्याला कधी समोर आणले जात नाही. हातापायाच्या काड्या, जसेकी भिंती सारवाव्या असे कातडे हाडाला चिकटलेले व पोटाचा नगारा झालेली, डोळ्याची बुब्बुळं वर येऊन त्याखाली काळीभोर पडलेल्या त्वचेने, हतबल मातेच्या कडेवर आशाळभूत स्थिरावलेली बालके आम्हाला कधी दाखवलीच जात नाहीत. एखाद्या बेजबाबदार मुलाने घरातील पंखा बल्ब किंवा नळ बंद न करता निघून जाणे. आणि ते व्यवस्थित बंद करण्यासाठी घरातील जबाबदार वडिलांनी उठून सारे व्यवस्थित करावे. तशाच प्रकारातील 'मेळघाटच्या कविता' हा काव्यसंग्रह वाचताना मला वाटला. स्वत:च्या शरीराला निसर्गदत्त मर्यादा असूनही कवी डाॅ. श्रीकृष्ण राऊत मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात फिरतात. तेथील मोठ्या प्रमाणात आढळणार्या 'कोरकू' जमातीचे जीवनमान समजून घेतात. त्यांच्या जीवनातील दुरावस्था समाजासमोर मांडतात. या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
चाळीस वर्षाहून अधिक लेखनाचा प्रदीर्घ प्रवास करतांना, कवीने स्वत:चे उजवे स्थान अबाधित राखतांना, 'मेळघाटच्या कविता' ही संहिता समाजाला ओंजळभरून देणारी नक्कीच आहे. डाॅ. श्रीकृष्ण राऊत यांनी स्वत:चे वेगळेपण जपले आहे. त्यांनी चाळीस वर्षाहून प्रदीर्घ साहित्य प्रवासात पाच सहा पुस्तकाची निर्मिती केली आहे. प्रचंड वाचन व समाजमनाच्या दांडग्या अभ्यासातून त्यांनी जरी अल्प साहित्य निर्मिती केली असेल, तरी ती अभिजात शिक्कामोर्तब होण्यासाठी पुरेशी आहे. दोघांचे घाव कामाचेच असतात. परंतु सोनाराला एकोमागोमाग अनेक घाव घालावे लागतात. तसेच लोहाराचा एक घाव हुकमी असतो. तसेच अनेक घाव घालून घडवलेल्या सोन्याचे मूल्य अधिक असते.
'मेळघाटच्या कविता' या काव्य संग्रहाने विरोधाभास दाखविणारे चित्र अधोरेखित होते. आपण वावरत असणार्या समाजात अती खाद्य सेवनाचा दुष्परिणाम म्हणून पोटात मेदाचा डोह तयार झाला आहे. त्याने मधुमेहा सारखे आजार 'जिवच्छ कंठश्च' मित्र जोडले गेले. या मित्रांची संगत सोडण्यासाठी सकाळी उठून हंडाभर घाम गाळावा लागतो आहे. तर दुसरीकडे अती कठोर मेहनत करूनही शरीर पोषणाचे अन्न मिळेना अन् कुपोषणग्रस्ततेतून लहान बालकांची पोटं वाढलेली दिसतात. कोरकू म्हणजे माणसं. सहजपणाने एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न करते. 'तुम्ही कोण?.' आपले उत्तर ठरलेले असते. आपल्या ठरलेल्या उत्तरात आपण आपले नाव, गाव सांगत असतो. परंतु समोरून उत्तर आले. मी 'कोया' किंवा 'कोरकू' तर विचार करण्यासारखे शब्द आहेत. आज माणसाला मी माणूस आहे. हे एकविसाव्या शतकात सांगावे लागत असेल तर, आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून काय दिवे लावलेत?.
'होमो सेपियन्स' ही मुळची आफ्रिकन जमात ऐंशी हजार वर्षापूर्वी स्थलांतरीत होऊन जगभर पसरली. त्यांनी येथल्या निसर्गाशी जुळवून घेतले. ते या जगातील मूळ रहिवाशी आहेत. तरी आज त्यांचे प्रश्न वेशीला टांगून आहेत. त्याचे कारण कदाचित त्यांना प्रचलित जात धर्म नाही म्हणूनही असेल. ते कुठल्या सांप्रदायिक व्यासपीठाचे सदस्य नाहीत म्हणूनही कदाचित असेल. किंवा त्यांचे संगठन कुठल्या राजकीय पक्षाला विजयासाठी निर्णायक ठरत नसेल. एक वेळ जंगलच त्याचे उपजीविकेचे साधन होते. ते जंगल वनविभागाच्या अखत्यारीत गेले. आणि जंगलचा राजा असणारा आदिवासी पुन्हा उपरा झाला. ग्रामीण किंवा शहरी संस्कृतीची स्व-ओळख आहे. तशी अजून अतिदुर्गम भागातील आदिवासींना मिळाली नाही. मेळघाटात जाऊन सुंदर निसर्ग कवितांनी वाह वाह मिळवता येऊ शकते. परंतु तेथील आदिवासी जनजीवन समजून घेण्यासाठी कवीने घेतलेली प्रचंड मेहनत डोळ्यासमोर उभी राहते. जमातीने आदिवासी असणार्या कवीने आदिवासी जनजीवन कवितेत मांडावे. हे लक्षात येते. परंतु बिगर आदिवासी असलेल्या डाॅ. श्रीकृष्ण राऊत यांनी आदिवासी जनजीवन कवितेतून मांडले आहे. म्हणून त्यांचे विशेष काैतुक करावेसे वाटते. 'मेळघाटच्या कविता' या संग्रहातील पहिली कविता निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करते. तसेच जगण्यासाठी तूच उपयोगी आहेस. हे सांगते.
वरुणा! वरुणा!!
तुझ्या डोळ्यांतून
झरू दे करुणा!
गाईच्या पोटाला
हिरवा चारा दे,
चिमण्या ओठाला
दुधाच्या धारा दे.
मिठाच्या कणाला
झोंबू दे भाकर
मुंगीच्या सणाला
सांडू दे साखर.
आम्हाला आमच्या मुलभूत गरजा पुरवणारा येथे कुणी माणूस असू शकत नाही. फक्त निसर्गच आम्हाला देईल. म्हणून वरुणाकडे मागणी आहे. माणसाची कविता लिहितांना कवी लिहितात. एका हतबल मातेचे मनोगत. जी तान्ह्या बाळाला निजवतांना अंगाई गाते आहे. ती अंगाई वाचकांचे मन कातर केल्याशिवाय राहत नाही.
जो जो रेऽ बाळा जो
उपाशी बाप रानात जायऽ
पोटाला पालू बांधून मायऽ
पोटात तुझ्या घालू मी कायऽ
जो जो रेऽ बाळाऽऽ जोऽ
जंगलावर उपजीविका असणार्या या माणसांची श्रद्धास्थाने अधोरेखित करतांना 'डोंगरदेवाचं' कवितेतून कवी सांगतात.
डोंगर देवाचं उघडं धन
नदीच्या काठानं मोहाचं बन
मोहाच्या फुलांचा पडला सडा
फुलांच्या मिसानं अस्वल खडा
मोहांच्या फुलांची पडली रास
मातीला लागला मोहाचा वास.
अशाच एकाहून एक कविता वाचकाला मेळघाटचे आगळेवेगळे दर्शन घडवते. मेळघाटातली खरी संस्कृतीची ओळख करून देते. या कविता वाचतांना कवितेच्या छंदाची ओळख करून देतात. पाचवीला संघर्ष घेऊन जगणारी माणसं दाखवतात. एक सुंदर साहित्य कृती वाचनाचा आनंद लाभला. हाच आनंद माझ्या सारख्या प्रत्येक वाचकाला लाभेलच. 'मेळघाटच्या कविता' या
कवितासंग्रहाला डॉ.मधुकर वाकोडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून
डॉ. किशोर सानप यांनी
प्रत्येक कवितेसंबंधी केलेले
सखोल भाष्य वाचकांच्या
आकलनाच्या कक्षा विस्तारणारे आहे. जयंत गायकवाड यांचे आगळेवेगळे मुखपृष्ठ संग्रहाचे सौंदर्य अधिक खुलवते.
'मेळघाटच्या कविता ' ह्या 'संहितेचे मनापासून स्वागत. तसेच कविवर्य डाॅ. श्रीकृष्ण राऊत सरांचे मन:पूर्वक अभिनंदन !
■ मेळघाटच्या कविता
■ श्रीकृष्ण राऊत
■ संवेदना प्रकाशन, पुणे
■ किंमत रु.१५०
■ पुस्तकाकरिता संपर्क : ८६६८६८५२८८
...................................................................
दै. विदर्भ मतदार दि. १ मे २०१२
No comments:
Post a Comment