कवितेचा परीघ विस्तारणारी
अस्वस्थ सौंदर्यानुभूती
■
□ डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, बुलडाणा
.
मेळघाटच्या कविता' हा डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचा अलीकडेच प्रकाशित कवितासंग्रह, शीर्षकावरूनच या संग्रहातील कविता मेळघाटातील दुर्गम, दुर्लक्षित भागाचे चित्रण अधोरेखित करणाऱ्या तसेच त्या भागात वास्तव्य करणाऱ्या कोरकू आदिवासींच्या जीवनावर, तेथील पारंपरिक लोकसंस्कृतीवर, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरकूंच्या वाट्याला येणाऱ्या याचा अंदाज येतो. मात्र, त्यासोबतच एका ख्यातकीर्त गझलकार, गीतकार तसेच काव्याचे विविध प्रकार लीलया हाताळणाऱ्या प्रतिभावंताला 'मेळघाटातील कविता' का लिहाव्या वाटल्या असतील, असा प्रश्न पडतो. आदिवासींच्या भावभावनांशी तादात्म्य पावण्याची कसोटी डॉ. श्रीकृष्ण राऊतांसारख्या कलासक्ताने या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने पेलली आहे..
राज्यातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट, चिखलदरा, धारणी या भागात कोरकू ही आदिवासी जमात वास्तव्य करून आहे. त्यांच्या भाषेला विशिष्ट लिपी नाही. निसर्गाशी एकरूप होत, निसर्गाचे नियम पाळत ते समाधानाने जगतात. या कोरकू आदिवासींच्या
पाड्यावर राहून त्यांच्या पारंपरिक मौखिक गीतांचा अभ्यास करून आदिवासींच्या जीवनसंघर्षांवर डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी कविता लिहिल्या आहेत. एका संवेदनशील मनाने कोरकूच्या जगातील कोणते वास्तव आपल्या शब्दांत उतरवले आहे आणि हे करताना त्यांच्या कल्पनाशक्तीने व प्रतिभेने साधलेली करामत खरोखर प्रेरणादायी आहे.
या काव्यसंग्रहात निसर्गाशी संवाद साधणारी कोरकू स्त्री
येते; तसेच निर्मल मनाचा, सागासारखा सरळ असणारा पण विषमव्यवस्थेत खाक होणारा, संकटसमयी निसर्गाचा धावा बोलणारा भाबडा आदिवासी समूह येतो. सोबतच त्यांच्या भोवतालचे निसर्गचित्रण व नियतीही येते.
पाऊस म्हणजे जीवन म्हणूनच त्याला दात्याचं रूप देऊन आदिवासी बांधव त्याची करुणा भाकताना म्हणतात
'वरुणा!वरुणा!!
तुझ्या डोळ्यांतून
झरू दे करुणा! '
किती सुंदर कल्पना आणि लय आहे या कवितेची! स्वतःपुरतेच नाही गाईला चारा, मुंगीला साखर मिळू दे आणि 'मुळांचा आनंद शेंड्यात नाचू दे!' अशी समस्त चराचराच्या सुखाची मंगलकामना या कवितेतून व्यक्त आहे. आणखी एक अशीच भावना व्यक्त करणारी कविता आहे,
'अरे पावसाच्या देवा
असा रुसू नको बापा
धरतीच्या पोटातून
पहा निघतात वाफा !
अरे पावसाच्या देवा
नको पोटावर मारू लेकराला - वासराला
सांग आता काय चारू?
फक्त लेकराची नव्हे तर गाईच्या वासराचीही चिंता येथे दिसते. नदीला 'माय' संबोधून तिच्याकडेसुद्धा हे भोळे भाबडे जीव मागणे मागतात.
'सिपना वा माय,
तुझ्या लेकी साध्या भोळ्या,
हाण्डोर भरून
देई चांदीच्या मासोळ्या '
लोक निसर्गाकडे केवळ स्वतःपुरतं कधीच मागत नाही, तर सगळ्यांना सगळं मिळावं ही त्यांची भावना असते. स्त्री मनाचा अत्यंत हळवा आणि संवेदनशील कोपरा पुढील कडव्यातून कवीने पुढील ओळीत उघड केला बघा-
'सिपना ओ माय
पाणी वाघाला दे पिऊ, गरवार गाय
त्याला दिसू नको देऊ '
आदिवासींच्या विकासासाठी केलेल्या विविध योजनासुद्धा त्यांचे शोषणच करतात. मग ते
रोजगार हमी योजना असो की अंगणवाडी. आश्रमशाळेतूनही मुलींवर अत्याचारच होतात
'शिपायांच्या घरी
देतो तुला जागा
रात्रभर हाडं
तिथं टाक फुला '
शिक्षणासारख्या क्षेत्रातही सतत होणारे शोषणच त्यांच्या वाट्याला येते. छोट्या-छोट्या गरजांसाठी मुलींना विषयवासनेची शिकार व्हावे कटू सत्य 'पाढे वाच पाढे" या कवितेतून उघड झाले आहे. जंगली प्राण्यांची शिकार करणे गुन्हा असला तरी शहरी पाहुणे कोरकूंना शिकार करण्यास भाग पाडतात, हे सत्यही 'मोठ्याच्या घरी' या कवितेतून पुढे येते.
आदिवासींचे शोषण असे निरनिराळ्या पातळ्यांवर आणि अनेकविध तऱ्हेने होत असते. अनेकदा जंगलाला आग लावली जाते आणि त्यात अधिकारी, व्यापारी, राजकीय नेतेमंडळीची आपापली पोळी भाजून घेतात. आदिवासी मात्र आपल्या डोळ्यासमोर आपले जळणारे जंगल बघत राहतो. सागासारखे सरळ साधे मन असलेल्या आदिवासींना आपल्याच जंगलात उपरे व्हावे लागते. वनउपज वापरण्याचीही मनाई करून कोंडवाडा
त्यांच्या नशिबी येतो. मेळघाटात व्याघ्रप्रकल्प जाहीर झाला; मात्र त्यासाठी मेळघाटातील कोरकूंवर निर्वासित होण्याची वेळ आली. त्यांचे हाल झाले. ते 'वाघांसाठी घर हवे या कवितेतून उपहासात्मक शैलीने कवीने मांडले आहे.
कवितेची भाषा अत्यंत लयबद्ध, बोलीभाषेच्या जवळची असल्याने अन्याय अत्याचार, शोषणाचे चित्रणही आक्रस्ताळे आणि रटाळ होत नाही. बहुतांशी स्त्री मनाचे हुंकार असल्याने आपसूकच गेयता आणि कमालीची संवेदनशीलता घेऊन ही कविता अवतरली आहे. डॉ. मधुकर वाकोडे यांची समर्पक प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. तसेच डॉ. किशोर सानप यांनी या कवितांवर दीर्घ अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, 'मेळघाटच्या कविता' या संग्रहातील कविता आजच्या समकालीन मराठी काव्यक्षेत्रात प्रतिभेच्या तिसऱ्या डोळ्याचे सृजनसामर्थ्य आहे. नवे कोरे अनुभवविश्व आणि नावीन्यसिद्ध प्रतिमासृष्टीच्या अभिव्यक्ती मुळे या कविता मराठी काव्य लिखाणाला
पुन्हा मराठी कवितेच्या वैभवाकडे खेचणाऱ्या सिद्ध होतील. आजच्या समकालीन कवितेला लोकाश्रय नाही. या कवितांमुळे मराठी समकालीन कवितांना लोकाश्रय मिळेल.'
'मेळघाटच्या कविता' या संग्रहाचे जयंत गायकवाड यांनी काढलेले अत्यंत सूचक असे मुखपृष्ठ आणि श्रीधर अंभोरे यांनी रेखाटलेली सुरेख रेखाचित्रे संग्रहाचे सौंदर्य खुलवतात. संग्रहाच्या शेवटी शब्दार्थ सूची जोडल्यामुळे बोलीभाषेतील शब्दांचा उलगडा सहजपणे होतो.
ज्याच्या मानवी संवेदना अजून जागत आहेत आणि ज्यांना एक उपेक्षित जग जाणून घ्यायचे आहे. आदिवासी स्त्री संवेदना समजून घ्यायचे असणाऱ्यांनी, कोरकूच्या भाषेतील शब्दज्ञान वाढवायचे आहे, छंदोबद्ध कवितेचा अभ्यास करायचा आहे किंवा छंदोबद्ध कविता वाचायला आवडतात त्यांनी, तसेच भाषाशैली व सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्यांनी; एक आशयघन, सुंदर कवितानुभव घ्यायचा आहे, अशांच्या संग्रही हा कवितासंग्रह असायलाच हवा असा आहे.
'मेळघाटच्या कविता' (कवितासंग्रह)
कवी : डॉ. श्रीकृष्ण राऊत मुखपृष्ठ : जयंत गायकवाड प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे किंमत : १५० रुपये.
.....................................................................................
महाराष्ट्र टाइम्स । नागपूर शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२
.
No comments:
Post a Comment