डॉ. किशोर सानप : भाष्य ४


कोरकूंची एकच झोपडी आणि तीही लहानसी. तिथचं नवरा-मुलं-बायको-मायबाप असं आठदहा लोकांचं कुटुंब. रात्री मिळालं तर जेवण करून फाटक्या पांघरूणात झोपी जातं. शृंगाराला प्रतिकूल असलेल्या वातावरणातही बांगडीबंद रात, मुकाट रात, कुजबुज अंधारात... एवढ्या कमी शब्दात कवी जीवनातल्या रांगड्या शृंगाराच्या-बांगड्या मुक्या करणाऱ्या संबंधाच्या-सर्व नाजूक बाजू मांडू पाहतो.

'वेळूच्या बनात' ही 'षडाक्षरी शुद्धसती' छंदातली कविता कोरकूंच्या जीवनातील रांगड्या आणि जोरकस शृंगारभावांना व्यक्त करणारी कविता आहे. हा सर्व शृंगार-संभोग नवतीशी नवत्याचा आहे. वेळूच्या बनात बासरी बोलते नवतीचं पान वाऱ्यानं हालते. वेळूचं बन आणि वेळूपासूनच बनणारी बासरी ही नवती -नवत्याचं प्रतीक. वाऱ्याच्या स्पर्शानं हालणारं नवतीचं पान म्हणजे सुकुमार तारुण्याला स्पर्शाची झालेली चाहूल होय. कराडीच्या आडी नाल्यातली रेऊ रानच्या फुलाला शेजबाज मऊ. नदी आणि नाल्यातल्या रेऊत रानातल्या फुलांना भूमीचा बोचणारा रांगडा स्पर्शही सुखाचा वाटतो. शेजबाज मऊ या दोन भाषिक रूपात कोरकूंच्या रानातल्या शृंगार-संभोगाच्या सर्वच बिकट आणि उघड वाटा कवीने मोकळ्या केल्या आहेत. शृंगार-संभोगाची उत्कटता व्यक्त करतांना, चित्याची झडप मोरपीस वाटे, हरणीच्या अंगी सायळीचे काटे, या तीव्र, हिंस्त्र, रानवट प्रतिमांचा वापर करून कवी व्यक्त होतो. हे सर्व करतांना कवीचा संयम सुटत नाही, हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागते.

“काजळाची झाक' ही षडाक्षरी शुद्धसती' छंदातली कविता कोरकूंना आदिम काळापासून भयप्रद जाणवलेल्या दुःखद अनुभवांची अभिव्यक्ती करणा री उत्कट कविता आहे. अस्वलाची कोरकूंना सर्वाधिक भीती. अस्वलाचं आक्रमण मृत्यूभयापेक्षाही भयावह. झाकटीतच कोरकू स्त्रिया रानावनात मोहफुलांचा बेचा करण्यासाठी जातात. मोहफुलं जशी कोरकूंना प्रिय तशीच ती अस्वलांनाही आवडीची. कोरकू स्त्रियांच्या मनात कायम अस्वलाचं भय असतं अस्वलासारखी काळी आकृती त्यांना पडसावल्यात दिसली तरी त्यांच्या मनाचा थरकाप उडतो. मोहाच्या फुलाचा वास वाऱ्यासंगं फिरतो आणि आसपासच्या अस्वलांनाही तो आकर्षित करतो. आसपास असलेल्या अस्वलाची जाणीवही होत नाही. फुलं वबेचण्याचा मोह नादावला जीव धुंदावला, अशी त्यांची अवस्था असते. मोहफुलांच्या वासानं नादावलेल्या कोरकू स्त्रियांवर अस्वल हल्ला करते. झुंजुमुंजू रात्रीच्या अंधारात जणू हातपाय फुटलेल्या अस्वलाला, कोरकू स्त्रीला कवटाळणे-ओरबाडणे सहज शक्‍य असते. हिवाळी झाकट असूनही तिला दरदरून घाम फुटतो. उर धडधडतो. अस्वल आगीला घाबरतो म्हणून कोरकू जंगलात भटकतांना रात्री आणि कधी दिवसाही टेंभा, आगपेटी, चकमक जवळ बाळगतात. कधी कधी घरून निघतांना रात्रीच्या आठवणीत कोरकू स्त्री चक्रमकही सोबत घ्यायचं विसरते. अस्वलाचं काळं रूप अंधारात भिडलं की तिला आपल्या मायबापाची- धनी-लेकाची शेवटची आठवण होते. शेवटी रानभर बोंबा... या शब्दांतून कवी अस्वलाच्या तावडीत सापडलेल्या आणि जीवाच्या आकांताने रानभर बोंबा मारणाऱ्या स्त्रीच्या शेवटच्या आचक्यांचं दर्शन घडवतो. रानात ह्या बोंबा तशाच विरून जातात आणि कोरकू स्त्रीला आपला जीव गमवावा लागतो. अंधाराच्या साऱ्या प्रतिमांचा वापर करून, कोरकूंच्या जीवनाला आदिम काळापासून व्यापणारं हे काळ-काजळाचं -अंधारालाच हातपाय फुटल्याचं अस्वली दु:ख, कवीनं व्यक्त केलं आहे.

'कुस फेरते' ही 'हरिभगिनी' मात्रावृत्तातली कविता आहे. बालकवींची श्रावणमासी हर्षमानसी' तसे ना. धौं. महानोरांची 'फुलात न्हाली पहाट ओली' ह्या दोन कवितांनी ह्या वृत्ताला वैभव प्राप्त करून दिले आहे. हेच वैभव 'कूस फेरते' या कवितेनेही अधिक उंचीवर नेले आहे. कोरकूंच्या जीवनातलं साधंसुधं हिरवं-काळं-उघडं-नागडं चैतन्य कवीनं ह्या कवितेतून मांडलं आहे. हे चैतन्य जसं रानावतलं झाडाझुडपांच्या साथीनं नांदणारं आहे तसचं ते अस्वल-बिबट्या-वाघ-सिंह -हरीण-अन्य सर्व हिंस्त्र आणि दयाळू प्राण्यांच्याही साथीनं नांदणारं आहे. रानातल्या मोहफुलांच्या- मुसळीच्या नादानं नादावलेलं-झिंगू पाहणारं कोरकूंचं-अस्वलांचंही चैतन्य आहे. हेच चैतन्य कोरकू स्त्री-पुरुषांच्या संबंधातूनही बाहेर फुटून पडणारं आहे. चैतन्याचा स्त्रोत सजीव- निजींव दोहोंनाही नादावणारा असतो.सळसळतं चैतन्य जीवनाला आणि भोवतालच्या सृष्टीला व्यापून आनंदाच्या डोही विसावतं. ही कविता मनात ताल, लय, ठेका उठवणारी कमालीची गेय आहे. तिचं अस्तित्व आणि सौंदर्य शब्दात पकडणंही असंभव आहे. रसिकाच्या मनाचा ठाव घेण्याचं सामर्थ्य ह्या कवितेत आहे. शब्दचित्र, नादप्रतिमा, काव्यसौंदर्य आणि रूपबंधातलं कलासौंदर्य कसं असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही या कवितेकडे पाहता येईल. हे चैतन्य जितकं जीवनदायी आहे तितकंच ते मृत्यूची चाहूल देणाऱ्या, बाना- अस्वलाचाही भास- तितक्याच सौंदर्यासक्तपणे मांडणारं आहे. उदा.

'काजळकाळी गर्द सावली झाडाखाली हले -इुले 

दाट, लोंबत्या केसझुलीचा बाना चरतो मोहफुले'

'सिपना बनात' ही 'एकादशाक्षरी परिलीना' छंदातील कबिता. मायेनं घनदाट छाया देणारे बन. कोरकू भाषेत सिपना म्हणजे साग. म्हणूनच या सागाच्या बनातून वाहणाऱ्या नदीचे नावही सिपना. कोरकू मातृसत्ताक पद्धती मानतात. त्यामुळे कारभार स्त्रियांच्या हाती. पुरुष मोलमजुरी, शिकार करणारा. शिडूच्या नशेत झिंगणारा. काहीसा बेफिकीर. त्यामुळे संसाराचा गाडा कोरकू बाईच ओढते. कवीलाही कोरकू स्त्री सोबतच पुरुषांचीही दैनंदिन संघर्षाची विविध रूपे आकर्षित करतात. लाकूड फाटा गोळा करायला गेल्यानंतर परत फिशियला संध्याकाळ होते. वाट जरी नेहमीची असली तरी, घनदाट सिपना बनात वन्यप्राणी, साप यांचा मुक्त वावर परतीची वाट अधिकच कठीण करतो. भीतीदायक करतो.घराकडे परतण्याची लगबग आणि सिपना बनातील हल्लेखोरांच्या भीतीच्या सावटाखाली कोरकू माणूस कसा वावरतो याचे चित्रण कवीने 'सिपना बनात' या कवितेत केले आहे.

सागाच्या ओल्या पानांना पालवात गुंडाळून त्याची चुंबळ केली जाते. डोक्यावर ठेवली जाते. त्यावर लाकूड फाटा घेऊन परतीच्या प्रवासाला लागता लागता नेहमीच झाकट पडते. पण त्याला अंधाराची भीती बाटत नाही. त्याच्यासाठी ते रोजचंच. रस्ताही ओळखीचाच असतो. सूर्य मावळतीला गेला की लाकूड फाटा गोळा करता करता बैलगाडीच्या धुऱ्यासाठी आवश्यक लाकडांना कधीमधी खांद्यावर घेतले जाते. जंगल जरी त्याचंच असलं तरी लाकूड तोडायला बंदी असल्यानं जीव आतून घाबरलेला. सिपना बनात सापांचा, अस्वलांचा, वाघांचा मुक्त वावर असतो. त्या भीतीने त्याच्या काळजाची धडधड वाढते. आपसूक त्याच्या पावलांची गतीही वाढते. खांद्यावरच्या धुऱ्याच्या जोडीचं वजन सांभाळत त्याच्या धावल्यागत चालण्याला लयही प्राप्त होते. त्या चालीला कवी 'दुडकी चाल' संबोधतो. रान अंधारलं की रातकिड्यांचं गाणं सुरु होतं. कालाकाफटा म्हणजे भारद्वाज पक्षाचं घरट्यात परतणं सुरू झालेलं असतं.जसजसा अंधार वाढायला लागतो तसे त्याच्या हृदयाचे ठोकेही वाढतात. पावलांची गती वाढते. श्वास असा फुलतो जणू सापाचे फुस्सकारणेच. साप निशाचर. तोही बनात असू शकतो याची जाणीव त्याला अधिक जागरूक करते.पायाचं, श्वासाचं आणि नजरेचंही धावणं कवीने 'चौफेर नजर फेकणं' अशा शब्दात पकडले आहे. असा जीवघेणा प्रवास कोरकूसाठी रोजचाच. 'दूर दिव्यांचे थेंब' दिसले की त्याला हायसे वाटते. घर जवळ आल्याचा आनंद होतो. पण जोपर्यंत खांद्यावरची धुऱ्याची जोडी विकणार नाही तोपर्यंत त्याच्या हातात चार पैसे पडणार नाहीत. याची जाणीव त्याला होते. पैशाशिवाय चूल पेटणार नसते. खायला भाकर मिळणार नसते. हे शब्दात मांडतांना कवी म्हणतो, 'अजून तोंडाला भाकर लांब'. या ओळीत कोरकुंची अपरिहार्यता, अगतिकता आणि चिंता कवीने मांडली आहे. यातून कवी कोरकुंच्या वाट्याला आलेलं आदिम काळापासूनचं दु:ख तर नमूद करतोच; परंतु घरच्यांच्या तोंडाला जर भाकर देता आली नाही तर ते दुःखही सहन करणे कठीण आहे, याची जाणीव त्याला होते. जगण्यासाठी त्याची अशी असह्य धडपड चाललेली असते. सिपना बनाच्या साक्षीने तो दु:खाची उदास छाया त्याच्या चेहऱ्यावर दिसू न देता, जगणं आणि अनुभवणं कसे सुसह्य करतो, याची ही जणू दैनंदिनीच कवीने रेखाटली आहे. रोजचं वाट्याला आलेलं दु:ख, यातना, कळवळा, ओढग्रस्तता, उत्कटता, संकट आणि संघर्ष आरदींचं कवीनं यथार्थ वर्णन या कवितेत केलं आहे.

'टेंभरं पाडत' ही 'षडाक्षरी शुद्धसती' छंदातली कविता.  या कवितेतील स्त्री दु:खाचाच एक विस्तारित पदर आहे. सिपना बनात भटकंती करून कोरकू स्त्रिया जशा मोळ्या बांधतात तशाच त्या रानमेवा असलेली जांभळं, टेंभरं, कामुन्या, रानबोर अशी रानफळं गोळा करतात आणि शहराशी जोडणाऱ्या स्स्त्यांवर ह्या बायका उन्हातान्हात मातीमोल किंमतीला विकत बसतात. दोनचार रूपये पदरी पडतात. तितकीच त्यांच्या संसाराला मदत होते. सिपना बनातील उत्पादनं स्वत:साठी जशी ती वापरतात तशीच ती लोकांनाही उपलब्ध करून देतात. ही सर्व अंगमेहनतीची कामं कोरकूंच्या बायकाच करतात.

'अंगावर काढ दुखू' ही तिसरी ओळ पाचही कडव्यात पुनरावर्तनी आहे. दु:ख सनातन असलं तरी दु:खाची आच त्याच त्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे. सिपना बनात टेंभर पाडत, कामुन्या काढत, चारोळी चाखत ह्या बायका मरमर कष्ट करतात. शिणत-भागत, पदरी फाटत, उरात फुटत, लजित-फजित होत उन्हात शिजत, पाण्यात भिजत, झुजत-झिजत, चालत-बोलत अंगावर दु:ख काढतात. अंगाशी लगट करणारं रान त्यांच्या परिचयाचं असतं. अंगवळणी पडलेलं असतं. कारण, मातीनं घडत, वार्‍यानं मोडत, हसत-खेळत दु:ख अंगावर काढण्याची आदिम काळापासून ह्या बायकांना सवय पडलेली असते. कवीनं मेळघाटातील कष्टकरी स्त्रीचं करुण चित्र या कवितेत उभं केलं आहे.

'बान्यानं चाखावं' ही 'षडाक्षरी शुद्धसती' छंदातली कविता रानातल्या रांगड्या शृंगाराची सूचक आहे. अस्वल जसं मोहफुलांच्या वासानं नादावतं-झुलतं तसंच सातपुड्याच्या सिपना बनातल्या मधाचंही त्याला मोठं आकर्षण असतं. मधाचं पोळं सगळंच्या संगळं गिळणाऱ्या ह्या प्राण्याच्या नजाकतींच्या प्रतिमांचा उपयोग, कोरकूंच्या नवता-नवतीच्या शृंगाराला रांगडेपणाचा साज चढविणारा आहे. काळ्या बानाचे बारके केसाळ सावलीत लपलेले डोळे मोठे लक्ष्यवेधी असतात. सावज टिपण्याची त्यांची चोरटी आणि आकस्मिक हल्ला करण्याची शैली हिंस्त्र असली तरी तो त्यांचा धर्मच असतो. बान्याच्या डोळ्यांना डोळ्यांची पारख असते आणि त्यातूनच तो सावज टिपतो. कोरकू तरुण आपल्या आवडीच्या तरुणीची पारध करून तोही बान्यासारखाच रानात तिला एकटी पाहून तिच्या अंगाशी लगडतो. वक्षाच्या खोप्यात फडफडे पक्षी... खड्यांनी गोंदली पाठीवर नक्षी... हा अनुभव जगाचा विसर पाडणारा असतो. पाठीवर उमटणारी खड्यांची नक्षी सुखद वेदनेचा अनुभव बनतो.

'शेण अक्कण' ही पंचाक्षरी 'आन्दोलन' छंदातील कविता. कोरकूंचा ढाणा-पाडा हा दोन बाजूला समोरासमोर दहापंधरा मातीच्या झोपड्यांचा  असतो. काट्या तुराट्यांच्या ह्या बसक्या झोपड्यांना पांढऱ्या मातीचं लिंपण असतं. घरासमोर एक मोठा बसका ओटा असतो. घराचं लिंपण जरी अधूनमधून होत असलं तरी ओट्याचं लिंपण मात्र कोरकू स्त्री रोजच करीत असते. घराच्या समोरच्या भागी दरवाजाजवळच पांढऱ्या चुन्यानं कोरकू शैलीची दोन बाय दोन फुटी चौकोनी रेखाचित्रे असतात. त्यात हातपाय डोकं असलेली साधीसरळ माणसं असतात. कोरकूंची ती दैवतं -पूर्वज असतात. लोकभाषेच्या आणि कोरकूंच्या वास्तुशास्त्राची शैली कलात्मतेने मांडतांना ह्या निर्जीव वास्तूशैलीत कोरकूंच्या जीवनातलं सनातन दु:खही कवी व्यक्त करू पाहतो. वास्तू आणि जीव यांच्यातलं आंतरिक नातं कवी मांडू पाहतो.

शेण अक्कण... माती चिक्कण, केला कालवा... घेत गिलावा, जीव ओतला... ओटा घातला. हा ओटा जीव ओतून तयार केल्यामुळे जणू काय निप्पक आयना तयार होतो. ह्या ओट्यावर ती आवडीची मोहफुले पाटी पाटीनं वाळवते. वाळल्यावर मळक्या पालूत ती बाचके बांधते. घारीसारखा व्यापारी टपून असतो आणि कवडीमोल किमतीत बाचके लांबवतो. हाती पडलेल्या चार पैशातच होळी-पुनव साजरी करायची असते. हा नित्याचा अनुभव म्हणून तिला बोभाटाही करता येत नाही. सारं जगण्यातलं विपरित विसरण्यासाठी त्या होळी -पुनवेला रात्री बेभानपणे रातभर नाचतात. सर्व दु:ख पचवता येण्यासारखंच असतं. परंतु घरधनी गेला तर तिच्या वाट्याला येणारं दु:ख ती विसरू शकत नाही.

मेळघाटातल्या कोरकूंच्या जीवनातलं हे दुःख तर आदिम असं दु:ख आहे. सनातन दु:ख आहे. रित्या ओट्याचं शेण भकास, रया उडाली माती उदास... ह्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दु:ख प्रतिमांच्या माध्यमाने कवी कोरकूंच्या आदिम दुःखाला कारुणिक रूप प्रदान करतो. एवढी शक्ती कवितेच्या शब्दात सामावली आहे.

'महुच्या ऽ झाडा' ही 'अष्टाक्षरी पादाकुलक' छंदातली कविता. सिपना बनातील सागवानाच्या तुलनेत कोरकूसाठी महुची झाडं अधिक प्राणप्रिय असतात. महुची फुलं जशी अस्वलांना आवडतात तशीच  कोरकूनांही. फुलांपासून ते शिडू (दारू) तयार करतात. शिडूशिवाय त्यांचा दिवस उगवतही नाही आणि मावळतही नाही. महूच्या फुलांचा मधाळ पण मादक गंध कोरकू तरुण तरुणींना प्रेमालापासाठी, शृंगारासाठीही आकर्षित करतो. म्हणूनच महूचं झाड कोरकूंच्या जीवनात सार्वभौम संस्कृतीचे प्रतीक असते. ह्या कवितेत कोरकू प्रियकर आपल्या प्रेयसीला महूच्या झाडाची उपमा देतो. सांकेतिक संवाद साधतो. शरीराच्या बिविध अंगावर प्रेयसीने ल्यालेल्या आभूषणांच्या माध्यमातून तो मनाची घालमेल तिच्यापर्यंत पोहोचवतो. हळवं प्रेम आणि रांगडा शृंगार हे कोरकूंच्या नैसर्गिक जीवनाचं सारतत्त्व आहे. आर्थिक विपन्नतेमुळे कोराकुस्त्रियांच्या अंगावर चांदीचे दागिने अधिक. प्रेयसीच्या गळ्यातल्या 'तगिलीला' बघून त्याचा जीव वेडापिसा होतो. प्रेमात घेतलेल्या आणाभाका स्मरतात. संगतीनं जगण्याची आण काही केल्या तुटणार नाही हे सांगून तो तिला आश्वासित करतो. तिच्या दंडातल्या बकडियांनी' दिलेली करकचून मिठी त्याला अधिकच बेचैन करते. बोटातली 'मुंदी' त्याला आयुष्यभर प्रेमाचा वेढा असाच तिच्याभोवती घालण्यासाठी खुणावते आहे. पायातल्या 'सोरयीनं' असा फेर धरला आहे की तो काही केल्या खुंटत नाही. एकूणच शरीरावरचा प्रत्येक दागिना त्याच्यापेक्षा तिच्या अधिक जवळ असल्याने हा प्रियकर वेडावला आहे. हे कवीने हेरून, त्याच्या भावविश्वात शिरून, त्याची मानसिक स्थिती, वेडावणं, झुरणं गीत रूपानं मांडले आहे.

____________पुढे भाग ५ पहा_______________________

No comments:

Post a Comment