डॉ. किशोर सानप : भाष्य ६


परतण्यासाठी आतूर होतात. घरी लेकरू वाट पाहते. त्याला अंगावरचं दूध पाजायचं असतं. नवरा-मुलांसाठी रोट्या तयार करायच्या असतात. शेतीचे मालक सरंजामी स्वभावाचे असतात. ते लोक मेळघाटात ठेकेदारी- शेती व्यवसाय करतात. काम संपलं तरी सांजवेळ अधिक होईपर्यंत तो बायकांना कामाला जुंपतो. मजूरी कापण्याची धमकी देतो.

कोरकू तरुणींच्या मनाची लाही लाही होते. पांदणीत किर डसे अंधार अंगाला, आग लागो वाटे बाई, कुवाँरपणाला... 'अर्ध्या पाथीचीच हाव' ही बहुआयामी प्रतिमा आहे. पांदणीच्या अंधारात कुवाँर पोरींना धोका होतो. घराची ओढच एवढी मोठी जबर असते की इचू-काटा, पान-साप यांनाही पाय गिनत नाहीत. डगपिसी वढ जाते चालीत भिनत... घर जवळ आलं की चढही हलका वाटतो. आतून डगडगणारी पायदुखीही सुसह्य होते.

'धडधड पेटे' ही षडाक्षरी 'शुद्धसती' छंदातली कविता. जंगल खातं जेव्हापासून भारत सरकारच्या ताब्यात आलं तेव्हापासून जंगलांना आगी लागण्याचा शिरस्ता नियमित सुरू झाला. अधिकारी, ठेकेदार, शिकारी -व्यापारी मिलीभगत करून जंगली उत्पादनं - सागवान- मुसळी -व्याघ्र-मृगांची कातडी-वनौषधी आदींचा चोरटा व्यापार करतात.

राजकारण्यांचाही या चोरट्या व्यापाराशी निकटचा संबंध असतो. बिचारे जंगलाचे मालक असलेले आदिवासी कोरकू मात्र आपल्याच भूमीवर चोर ठरवले गेले. कायम भीतीचं पाखरू त्यांच्या मनात उडत राहतं. पकडले जातात तेव्हा मालाची तर जप्ती होतेच परंतु शरीराच्या भोगाने सुखवस्तू देह रंगतात. जंगल पेटलं तर त्यामुळे नुकसान कुणाचं होतं? देशाचं आणि जंगलातल्या कोरकूंचं-प्राण्यांचं-संपत्तीचं. अधिकाऱ्यांच्या हाडावर कोणती चोट? त्यांना तर जंगल राखण्याच्या नावाखाली जंगल उजाड करण्याचा -शिकार करण्याचा-चोरटा व्यापार करण्याचा-आगी लावण्याचाही पगार मिळतोच की नाही? मरणाच्या कराल दाढेत ओढले जातात ते जंगलाच्या वस्तीत राहणारे कोरकू आणि जंगलातले प्राणी. जंगलातील आग ही क्षणार्धात जंगलव्यापी होते आणि पाहता पाहता जंगल काळं ठिक्कर पडतं. घडधड पेटे झावातून उन, लहा लहा जळे भट्टीवाणी रान. जंगलातल्या आगी ऐन उन्हाळ्यात लागतात. कारणं देता येण्यासारखा आणि आरामात सुटका करता येण्यासारखा हा उजागर मोसम असतो. भुरू भुरू चरे गवतानं आग, काळेकाळे भोर भुईवर डाग... डांग डांग नंगी झडे पानपान, थेंबार्थेबासाठी काय वणवण... ही आगीत जळणाऱ्या जंगलाची चित्तरकथा.

'सागाहून सिधं' षडाक्षरी 'शुद्धसती' छंदातली कविता. कोरकूंच्या हतबल जगण्याचा आशय मांडणारी ही कविता आहे. साग हा सरळ वाढणारा सोन्यासारखा मौलिक वृक्ष. कोरकूंचं मन त्याहीपेक्षा साधं -सरळ असतं. सागाहून सिधं साधंसुधं मन... झालं जळतण. सागाचं जळतण होणं म्हणजे मौलिकतेच्या वाट्याला माती येणे होय. कोरकूंचं हसणं हे जित्या झऱ्यासारखं असतं. परंतु दु:खाच्या शेवाळानं झऱ्याचं निखळपण हरवतं. कुरणानं केली चरण्याला बंदी... कोंडवाडा फंदी. जंगलात राहणं आणि जंगलातली हक्काची उपज वापरण्यावरही कोरकूंना बंदी असते. प्रसंगी कोंडवाड्यातल्या ढोरांसारखी वागणुक त्यांना मिळते. आपल्याच भूमीत कोरकू चोर ठरतो आणि कधी कधी सरकारी अधिकारी त्यांना बंदीही बनवितात. पावसाच्या घाती अस्वलाची नखं टणक नखं नरम पडतात आणि वारूळ फोडून त्यातली वाळवी ते खाऊ शकत नाही. वारूळातील वाळवीची राणी-टेकराज अळी तारुण्य टिकवून ठेवणारं औषध मानलं जातं आणि अस्वलांना ही अळी अतिशय प्रिय असते. परंतु पावसाळ्यात अस्वलाला नखांनी वारूळ फोडताच येत नाही. अगतिकता येते. तसं कोरकूंचं दु:ख. हतबल होऊन मुकपणे ते सहन करतात. उपमेय आणि उपमानांचा वापर करून कवीने कोरकूंच्या दु:खाच्या नाना परी व्यक्त केल्या आहेत.

'सालाबाद आली' ही षडाक्षरी 'शुद्धसती' छंदातली कविता. कोरकूंच्या जीवनात होळीला अतिशय महत्त्व असतं. होळी ही त्यांच्यासाठी दिवाळीसारखा उत्सव असतो. घरातलं आहे ते विकटाक करून किंवा सावकाराकडून कर्ज काढून होळीचा उत्सव महिनाभर ते साजरा करतात. अंगावर नवीन कापडं आणि शिडू मटन-मासोळीत त्यांचा जीव गुंततो. 

सालाबाद आली चैताची पुनीव... नाचू लागे जीव... अशी त्यांची अवस्था असते. महिनाभर रोज रात्री नाचगाणं चालतं आणि मनातलं सारं दुःखं दूर होतं. उधारीच्या घरी उसनी पाहुणी... आली हरखुनी. अडक्याला दिडक्याची मोळी विकणारे हे लोक होळीसाठी आतूर असतात. काचोळीही त्यांना विकत घेणं जुळत नाही परंतु होळीच्या सणाला ते वर्षभरातली सर्व राखून ठेवलेली कमाई उडवतात. जिभेचा चटका उजवते होळी... नवाईची पोळी त्यांच्या तोंडी लागते. पाखरासारखं चांदणं उडालं तरी गाण्यात बुडून त्यांच्या मनाचा निचरा होतो. ह्या सणाला बेधुंद होउन नाचण्याचं बळ त्यांना संस्कृतीनं पुरवलेलं असतं.

'वाघासाठी हवे घर' ही अष्टाक्षरी 'पादाकुलक' छंदातली कविता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये अस्तित्वात आली. जंगलात मूळवस्ती असलेल्या आदिवासी लोकांना जंगल खाली करावं लागलं. घनदाट जंगलातून त्यांचं स्थलांतर घडवून आणलं. कोरकू परका झाला. मेळघाटात व्याप्रप्रकल्प जाहीर झाला आणि कोरकू निर्वासित झाला. कोरकूंचे हालहाल झाले. कवी सरकारी योजनांचा आणि जांगड्यांच्या कारस्थानांचा उपहास करतो. वाघासाठी हवे घर... गाव तुझे खाली कर. वाघांसाठी घर हवं आहे म्हणून जंगलातल्या मूळ निवाशांना सरकारनं हाकलून लावलं. पोट बांध पाठीवर... शहराची वाट धर. चिल्यापिल्यासाठी खोपा... झाडाखाली कर बापा. मालकाला एकसाथ... तिचे-तुझे बीक हात... ही कोरकूंची दुरावस्था. बेघर झालेल्या कोरकूंच्या वाट्याला आलेलं दु:ख कवीला अस्वस्थ करणारं आहे. प्राण्यांसाठी जंगल आणि जंगलाच्या संरक्षणासाठी वनखातं. कोरकूंच्या संरक्षणासाठी काय? ह्या प्रश्‍नाचं उत्तरच कुणी द्यायला तयार नाही.

'फुटे झाडोऱ्याला डोळा' ही चतुर्दशाक्षरी (८-६) 'लवंगलता' या छंदातील शृंगारिक शब्दचित्र रेखाटणारी कविता. फुटे झाडोऱ्याला डोळा- आंधळली लाज... तटतट सुटे गुंडी- सैलावले काज... दऱ्याखोऱ्यात चालणाऱ्या शृंगाराला निसर्गातील प्रतिमांचा साज कवी चढवतो. पलटता पाखा, गोंदलेली मोरनक्षी, वाबटुळे वारा, शीळ घालणारं खोरं, आंधळली लाज, तटतट सुटे गुंडी, सैलावले काज, रुतलेला जरीकाठ, अवघडलेला दंड आदींच्या माध्यमातून कवी कोरकूंच्या शृंगारकथांचे चित्र उभे करतो.

'मीठ न्या हो' ही चतुर्दशाक्षरी (४-४-६) 'पद्मछंद-शुद्धसती' छंदाचा मिश्र प्रयोग करणारी कविता. कोरकूंच्या जीवनाची हलाखी या कवितेतून व्यक्त होते. कोरकू निर्वासित झाल्यापासून त्यांच्या वाट्याला भिकाऱ्याचं जगणं आलं आहे.मीठ-मिर्ची- तेलासाठी कोरकू आठवडी बाजाराच्या ठिकाणी भेटतात आणि आपल्या दुः:खांची देवाणघेवाण करतात. दवाखान्याचे तोंडही न पाहणारे, बाजारात डॉक्टर कडून कधी कधी सुई टोचून घेतात. कोरकू शेती करतात. वनोत्पादनं बाजारहाटी नेतात. तिथं बसलेले लांडगे त्यांना लुटतात. एक उडी, दुजी उडी, उडी मेंढरांची... जारी सुगी, भारी सुगी, सुगी लांडग्यांची... पण सुगीचे दिवस मात्र कोरकूंच्या वाट्याला येत नाहीत.

'अंगणवाडीचा थिंगाणा' ही षडाक्षरी 'शुद्धसती' छंदातील कविताही कोरकूंच्या हाडक्या मुलांच्या शिक्षणाचा धिंगाणा व्यक्त करणारी आहे. ही कविता अंगणवाड्यांचे वास्तव उजागर करते. तिथली सुखडी, टोकर हरभरा, पोकळ चवळी, पावडरचं दूध खाऊनही कोरकू मुलं बाळसं धरत नाहीत. जिंदगी डोंगर ऽ कमाई उंदीर ऽ पोटातली गार बुजंना ऽ बुजंना ऽऽ जिंदगी डोंगराएवढी आणि त्यांची कमाई उंदिराएवढी. पोटातली भूक कधीच बुजत नाही. भागत नाही. कोरकू मुलं जशी आदिम काळापासून उपाशी तसेच त्यांचे मायबापही उपाशीच.

'रोजगार हमी' ही षडाक्षरी-पंचाक्षरी 'शुद्धसती-निर्झरगीत' छंदाचा मिश्र प्रयोग करणारी कविता. कोरकूंच्या शोषणाची निराळी तऱ्हा मांडणारी आहे. उन्हाळ्यात शेतीची कामं नसतात. कोरकूंसाठी विविध सरकारी योजना येतात आणि त्या कागदपत्रांवरच जिरवल्या जातात. रोजगार हमीचीही योजना कोरकूंपेक्षा मुनीम-अधिकाऱ्यांच्याच भल्यासाठी राबवली जाते. नियंत्रण कुणाचंच नाही. रोजगार हमी कशाची कमी? असं वाटत असलं तरी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही... हे वास्तव असतं. शाईतून कसा फेकला फासा, उठला ठसा अंगुठा फसा... कोरकू बिचारे निरक्षर. मुनीम अंगठा लावून त्यांच्या गळ्यात जणू फासच टाकतो. कोरकूंच्या श्रमाची त्यांच्या साक्षीनेच चोरी करतो. कोरकूंना कळत असलं तरी वळत नाही. पोटातली भूक त्यांना निमूटपणे होणारं आर्थिक शोषण सहन करायला भाग पाडते. कुपनाचे गहू अधिकारी -व्यापारी खातात आणि उरलेला खकाना-भूस कोरकूंच्या नशिबी येते.

'अरे पावसाच्या देवा' ही अष्टाक्षरी 'पादाकुलक' छंदातली कविता. वरुणा वरुणा या कवितेसारखीच वरुण देवाला आळवणारी कविता आहे. अरे पावसाच्या देवा असा रुसू नको बापा, धरतीच्या पोटातून पाहा निघतात वाफा... उन्हाने लाही लाही झालेला जीव पावसाची चातकासारखी वाट पाहतो. पावसाला दयामाया नाही. अरे पावसाच्या देवा नको पोटावर मारू, लेकराला-वासराला सांग आता काय चारू? कोरकूंना आपल्या पोटापेक्षाही आपल्या घरातल्या ढोरांच्या चाऱ्याची चिंता अधिक. पाऊस आला नाही तर प्यायलाही पाणी मिळत नाही. थेंबाथेंबासाठी मायबाईला पायपीट करावी लागते. पावसाच्या बरसण्यावर जसं कोरकूंचं जीवन असतं, तसंच कोरकूंना पोसणारं जंगलही पाण्यावरच फुलतं-फळतं. जीव कासाविस होतो. कोरडा दुष्काळ पडला तर कोरकूंचं जीवनसर्वस्व हरपतं. जंगलासारखंच कोरकूंचही जीवन उजाडतं. असा दुर्धर जीवघेणा बाका प्रसंग टळावा म्हणून कोरकू पावसाच्या देवाला आण घालतात. अरे पावसाच्या देवा, देरे आम्हा जीवदान... तुझ्या मायच्या दुधाची, तुला घालतो मी आण...एवढ्या निकराची आण घातल्यावर तरी पाऊस येईल अशी कोरकूंना आशा असते.

कवितेच्या रचनेविषयी...

'मेळघाटच्या कविता' या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. आजच्या मुक्तछंदी कवितेच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्व कविता छंदात असल्यामुळे त्यांना विशेषत्व प्राप्त होते. छंदात्मक कवितेत आशयाशी तडजोडी कराव्या लागतात; म्हणून कवींनी मुक्तछंदाचा स्वीकार केला, हा गैरसमज दूर करणाऱ्या ह्या कविता आहेत. पुरातन काळात साहित्याची पहिली अभिव्यक्ती गेय कवितेतून झाली होती. गेयता हे काव्याचे लक्षण असून छंदात्म पद्यबंधातच कवितेची निर्मिती झाल्याचा इतिहास आहे. कविता हे पद्य असून ते छदबद्ध असते आणि ते कधीही गद्यरूप -मुक्तछंदात पूर्वी विकसित झाले नाही.छंद-वृत्त-गेयता -लय-शब्द हीच काव्य- रचनेची मूल माध्यमे आहेत. ह्याच काव्य माध्यमातून कवितेचा रूपबंध आजवर सिद्ध होत आला आहे. महाकाव्य, संतकाव्य, महानुभाव काव्य, शाहिरी काव्य, आधुनिकही बहुतांश काव्य छंद-वृत्तांच्याच रचनेतून प्रस्फुटित झाल्याचे दिसते. तात्पर्य, कवितेला छद-वृत्त-गेयता- गीतं उपकारक ठरतात. मुक्तछंद हा काव्याच्या प्रकृतीला मारक ठरल्यामुळेच आजची मराठी कविता दुर्लक्षित राहिली आहे. कवितेपासून रसिक-आस्वादक दुरावला आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण राऊतांची छंदोबद्ध कविता आजच्या आधुनिक आणि समकालीन मराठी कवितेत, छदबद्ध कवितेचे पुनरूज्जीवन करणारी आणि पुन्हा मराठी कवितेकडे अपेक्षेने रसिकाला पाहायला लावणारी, नवीन वळणाची मराठी कविता ठरते. मराठी कबितेविषयी आज जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत -जसे मुक्तछंदरूप, गद्यरूप, वक्तृत्वरूप, पसरटरूप, गेयता-लय-काव्यहीन मूल्यांची मांडणी आदींमुळे मराठी कवितेकडे मराठी समाजही गंभीरपणे पाहत नाही. भारतीय भाषांत तर मराठी कवितेच्या दारिद्र्याला पारावारच नाही. मराठी कवितेचे दारिद्र्य दूर करून, मराठी कवितेला आपल्या देशीय कवितेचे बैभव मिळवून देण्याच्या -पद्यच निर्माण करून मराठी कवितेकडे काव्यरसिकांना वळविण्याचा -एक मौलिक प्रयत्न म्हणून मेळघाटच्या कविता संग्रहाकडे पाहावे लागते.

'मेळघाटच्या कविता' या कविता संग्रहात कवीने सामान्यपणे लोकगीतांतील आक्षरछंदांचा आधिक्याने वापर केलेला आहे. कोरकू ही आदिम जमात. त्यांची संस्कृती मातृप्रधान. सूजनाला प्राधान्य देणारी. गाणं हा कोरकूंच्या जीवनाचा अभिन्न जगण्याचा भाग. कला आणि जीवन यांचे अपूर्व-अतूट नाते. गाणं आणि नाचणं हा कोरकूंच्या कलाजीवनाचा स्थायिभाव. कोरकू कलाप्रिय. नृत्य, गायन, शिल्पकला, मूर्तीकला आदींमध्ये निष्णात असलेले हे आदिम कलावंत. त्यांच्या जीवनातलं दु:खही ह्या कलांमधूनच साकार होतं. कोरकूंच्या कला आणि त्यांची संस्कृती ह्यांचा जीवननिष्ठ वेध घेण्याचे सामर्थ्य कवीने लोकछंदात रचलेल्या कवितांनी सिद्ध केले आहे.

अत्यंत साध्यासुध्या शब्दांचे -नेमक्या आणि मोजक्या शब्दांचे पद्यबंध या कवितेत असल्यामुळे ती कुठेही दुबोध होत नाही. हिंदी-मराठी -कोरकू-वऱ्हाडी आदी भाषिक रूपांचा चपखल वापर करून, साक्षात काव्यरसिकाच्या मनाचा ठाव घेणारी ही कविता आहे. कवितेतील पद्यबंधांची रचना करतांना शब्दांची निवड प्रतिमांनाही नावीन्य प्रदान करणारी आहे. प्रतिमांची गर्दी नाही. दुर्बोध तर त्या मुळीच नाहीत. मराठी कवितेत प्रासादिक प्रतिमांची निर्मिती करून, सरळ या हृदयीचे त्या हृदयी पोहोचविण्याचे प्रातिभ सामर्थ्य ह्या कवीने सिद्ध केले आहे. प्रतिमेचा प्रतिभाधर्म समजून घेणारा हा कवी कवितेला प्राणसामर्थ्य पुरविणारा आहे. छंदाचे प्रयोग आणि प्रतिमांचा चपखल वापर एकाच वेळी करून, सर्वसामान्य काव्यरसिकाला काव्यमूल्यांच्या प्रदेशात नेणारा हा सक्षम कवी आहे.

पद्यबंध रचना : गेयता, लय, प्रतिमा

या संग्रहातील आशय कोरकूंच्या जीवन जाणिवांची आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यात काव्यात्म अभिव्यक्ती करणारा आहे. कवितेचा पद्यबंध तयार करतांना कवीने प्रास-यमक-अक्षरांचे पुनरावर्तन आदींचा वापर करून कवितेची संहिता लयबद्ध केली. कवितांना गाण्याची रूपं दिली. जनसमुहाच्या स्वीकृतीला आवश्यक असलेल्या लोकसंकेतांचा वापर करून कवीने ह्या कवितांची जागा काव्यरसिकांच्या मनावर अभिन्नपणे कोरली आहे. एखाद्या निष्णात शिल्पकाराने साक्षात शिल्पे कोरून ठेवावी, तशाच द्या संग्रहातल्या कविता म्हणजे कोरीव काव्यशिल्पेच होत.

भुलाबाईची गाणी शहरी -खेडोपाडी आजही गायिली जातात. कवीने भुलाबाईंच्या गाण्याच्या चाली -रचनाबंध स्वीकारून अनेक कवितांची अन्वर्थक निर्मिती केली आहे. अनेक लोकगीतांचा रचनाबंध स्वीकारून, कवीने लोकधाटी काव्यरचना केली आहे. उदा. जो जो रे ऽ बाळा ss जो ऽ, पाढे वाच पाढे, लामझ्याना, महुच्या5 झाडा, बाई द्या सुर्व्याला, अंगणवाडीचा धिंगाणा ऽ, आदी. पहिली कविता वरुणा! वरुणा! या कवितेचा पहिल्या कडव्याचा बंध पहा-

___________________ पुढे भाग ७ पहा_______________


No comments:

Post a Comment