डॉ. किशोर सानप : भाष्य ८


कवितेची रचना : भाषा आणि शैली

मेळघाट हा वऱ्हाड प्रांतात येतो. येथील कोरकूंना मराठी भाषा फारशी कळत नाही. मध्यप्रदेशाला लागून

असल्यामुळे संवादासाठी त्यांना हिंदी भाषा अधिक जवळची वाटते. कोरकूंचे भावविश्व शब्दबद्ध करताना कवीने मराठी-वऱ्हाडी- कोरकू-हिंदी भाषिक रूपांचा संमिश्र प्रयोग केला आहे. कवितेची संहिता निर्माण करतांना कवीला जसे छंद- वृत्तांचे भान असते तसेच पद्यबंधातील शब्दनिवडीचेही भान असते. कवितेची संहिता-रूपबंध रेखीव- कोरीव असल्यामुळे कवितेत कुठेही शब्दांचा सोस आढळत नाही. कविता साध्याभोळ्या आदिम जीवन जगणाऱ्या कोरकूंच्या व्यथा-वेदना-दु:ख मांडणाऱ्या असल्यामुळे अभिव्यक्तीचाही कमालीचा साधेपणा कवीने कोणत्याही कवितेत डागाळू दिला नाही. प्रत्येक कविता अर्थवाही प्रतिमांची निर्मिती करणारी असली तरी कोणत्याही कवितेतले प्रतिमाविश्व दुर्बोंधता निर्माण करीत नाही. कोरकूंचे विश्व मराठी कवितेला नवीन असल्यामुळे कवीने कवितांना सुगम गीतांचा आधार दिला आहे. प्रत्येक कविता गाता येते आणि गुणगुणता येते, हे या संग्रहातल्या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. एकूणच कविता लोकसंकेत-लोकगीते या अंगाने आविष्कृत होतांना दिसते. कवितेचा नैसर्गिक- स्वाभाविकपणा कुठेही खंडित होत नाही.

'मिठाच्या कणाला झोंबू दे भाकर, 

मुंगीच्या सणाला सांडू दे साखर,  

तहानेचे बुंद खुरात साचू दे, 

मुळांचा आनंद शेंड्यात नाचू दे, 

वरुणा वरुणा 

तुझ्या डोळ्यातून झरू दे करुणा 

अशा लोकसंकेतांची भाषिक रूपे एकूणच कवितेची संहिता भारून टाकतात. डोंगर देवाचं उघडं धन, नदीच्या काठानं मोहाचं बन, मोहाच्या फुलांचा पडला सडा, फुलांच्या मिसानं अस्वल खडा, मोहाच्या फुलांची पडली रास, मातीला लागला मोहाचा वास' -अशा अरण्य प्रतिमांनी कवीने आशय तोलून धरला आहे. उघडं धन-मोहाचं बन, पडला सडा-अस्वल खडा, पडली रास-मोहाचा वास, धन-बन, दाटी-पाटी, रास-वास, चुरा-बुरा... अशा प्रास-यमकसदृश्य रचनेमुळे कवितेला गाण्याचा तालसूर सापडला आहे. आशयाची ओघवती - द्रुत प्रवाही लयसुद्धा सापडली आहे.

'उपाशी बाप, महाग मीठ, पोटात वणवा, थुक्‍्याला गिटू, जांगडी बुरा, अस्वल खडा, मोहाचा वास, दौडले

रानी बंदूक भाले, सातमजली पाहुणा हसे, रानपाखरू खोप्यात दडे, सुकाची चांदणी, रातकीडा बोले, बोडका पहाड,रुखीसुखी झाडं, वाजतो पाचोळा, डांग-डुंग, डोईवर मोळी, भिजते काचोळी, पदराला घाम, जीव लाही लाही, चिमे फुलकळी, सातबैनाच्या चोचीत डुचमळे साद, सांजवेळी हिंदकळे दु:ख पापणीत, सावळ्याशा मुखावर सांडते चमक, रातभर नाचा, घुंगराच्या नादी, चांद गेला डुबी, कुंकवाचा थेंब, पाय घेती झोके, आभाळाचा डोळा, वाघुळात ससा,काडीमुडीचा संसार, भुताखेतांचा संसार, चार दिसांचा संसार, चांदीच्या मासोळ्या, सोन्याचे खेकडे, फुटे पदर पाण्याला, गरवार गाय, सिपना वो माय, जोडा फोडला, संग तोडला, हात सोडला, गावशिवेवर 

मुंडा, नवतीला उष्ट करी,

काट्यावरी दिवस काढी, 

लांडोरीच्या घरी नांदे, 

मोर पायी दोर बांधे, 

लामझ्याना, जळे चिडी अंधारात, काळजीला काजळी चढे, वात निजू निजू आली, बांगडीबंद मुकाट रात, नवतीचं पान, शेजबाज मऊ, चित्याची झडप, सायळीचे काटे, पडसावल्या, अंधाराला जणू फुटे हातपाय, रानभर बोंबा, रात सावळी, काळोखाचा फुले मळा, केसझुलीचा बाना, सात आसरा, चिवचिवणारी आळवणी, कालाकाफट्याचं गोद्यात येणं, दूरच्या दिव्याचे रंगीत थेंब, अंगावर काढ दूखू, बान्यानं चाखावं सातपुडी मध, वक्षाच्या खोप्यात फडफडे पक्षी, खड्यांनी गोंदली पाठीवर नक्षी, शेण अक्कण, रित्या ओट्याचं शेण भकास, रया उडाली माती उदास, महुच्या झाडा, येढा तिचा उठंना, फेरा त्याचा सुटना, काळा- काळाभोर शिसमाचा रंग, पोट संबूडेरा, चिपडात डोळे, मान खाई झोल, पाठपोट एक, वाळली खारीक, शेवाळले दात, तोंडावर माशा, कपाळात गोटा, कलदार खोटा, बिबट्याच्या जबड्यात हरणीचे थानं, बाहेर रोटी, जोजोममंधी रस्स्याच्या बोटी, पोटात शिडू, ओठात गाणं, नाचते रान, जमे नवी जोडी घुंगरू बाजारी, भगोरियाहाटी, घर घूसू पाहेफाटकी नादारी, तापाचं लेकरू पोटाला डागिलं, दुखाचं लेकरू पाठीला डागिलं, मरान डागिलं, गिरान सुटलं, ओठात धसे उपाशी दात, लोंढा डोळ्याला, मांडवाची ठुनी खाते लेकीला मोडून, मांडव शिंपला मोहाच्या पाण्यानं, बोराटीच्या काट्या, मासोळीचं जाळं, पोटाच्या आगीला पुरेना पाणी, पोटाला पडलं भोक, रानच्या केळीला हेरते भूक, अर्ध्या पाथीचीच हाव, डसे अंधार अंगाला, डगपिसी वढ, काळेकाळे भोर भुईवर डाग, डांगडांग नंगी, अडक्याला गेली दिडक्याची मोळी, नवाईची पोळी, चांदणं उडालं गाण्यात बुडालं, फुटे झाडोऱ्याला डोळा, गोंदणात मोर, वावटळे वारा, शीळ घाली खोरं, रुतलेला जरीकाठ, अवघडलेला दंड, पलटता पाखा, जिंदगी डोंगर, कमाई उंदीर, पोटातली गार बुजंना 5 बुजंना 5, शाईतून फेकला फासा, उठला ठसा अंगुठा फसा - अशा अर्थवाही-मूर्त-अमूर्त आशय प्रतिमा- लोकसंकेत-साकार करणारी अनघड भाषिक रूपं इत्यादींनी कोरकूंच्या जीवनजाणीवांचा एक भलामोठा कॅनव्हास कवीने या संग्रहातल्या कवितांमधून रंगवला आहे.

कवीने नवनवीन भाषिक रूपांची -आशयनिष्ठ प्रतिमांची निर्मिती करून 'मेळघाटच्या कविता' या काव्यसंग्रहातून स्वतंत्र शैली घडविली आहे. कवीची शैली कवीच्या नैतिक जीवनदृष्टीतून साकार होतांना दिसते. आशयद्रव्य-अभिव्यक्तीचे माध्यम- कवितेचा रचनाबंध यांच्या तादात्म्यातून कवीची शैली साकार झाली आहे. कोरकूंच्या आदिम आणि आधुनिक जीवनजाणिवांचा सूक्ष्म वेध घेण्याचे आशयसामर्थ्य उपरोक्त भाषिक खूपांतून सिद्ध होते. कोरकूंचं जीवन जंगलनिष्ठ, म्हणून जंगल जिवंत करणारी प्रतिमासृष्टीही कवीच्या काव्यातून साकार होतांना दिसते. 

आशयाच्या सुखद-दुःखद पदरांची नाजूक गुंफण कवीने केलेली आहे. भाषिक रूपं आणि प्रतिमासृष्टी भाषिक पुरोभूमीकरणाचाही  स्त्रोत ठरली आहे. नव्या अनुभवविश्वाचा मराठी जगताला परिचय करून दिला आहे. काव्यातील नावीन्य कवीने नवनवीन समतानतानिष्ठ प्रतिमासूष्टीतून व्यक्त केले आहे. मराठी कवितेला एका नव्या कोऱ्या अपरिचित शैलीचा परिचय करून देणाऱ्या ह्या कविता आहेत. कवीचे प्रातिभ सामर्थ्यही या कवितांच्या निर्मितीत पणाला लागलेले आहे.

श्रीकृष्ण राऊत हे १९७५ नंतरच्या समकालीन मराठी कवींच्या पिढीतील प्रयोगशील कवी आहेत. कवीची नैतिकता आणि कवीचा जीवनविषयक दृष्टिकोनउदार-आशावादी- स्वागतशील आहे. कवितेच्या छंद-वृत्तांचा आणि लोकगीतांच्या रचनाशैलीचा सूक्ष्म अभ्यास करणारा हा प्रतिभावंत कवी आहे. ह्या कवीने आजवर गेल्या चाळीस वर्षांत निरनिराळ्या रूपबंधांचा कवितेसाठी वापर केला. निरनिराळ्या अभिव्यक्तीच्या शैली वापरल्या. भाषेच्या सूक्ष्म वापराबाबत आणि सुबोध प्रतिमानिर्मिती बाबतही कवी त्याच्या सर्वच कवितांमध्ये सजग असल्याचे दिसते.

प्रयोगशीलता कवितेला मारक ठरणार नाही तर उपकारक ठरावी, ही कवीची काव्यनिर्मितीची जाणीव आजवरच्या त्यांच्या काव्यनिर्मितीतून प्रत्ययाला येते. कविता ही अल्पाक्षरी आणि आशयाच्या विशाल कक्षा निर्माण करणारा प्रकार असल्याचे काव्यभानही कवीने जपले आहे.

'मेळघाटच्या कविता' ह्या संग्रहातील कविता आजच्या समकालीन मराठी काव्यक्षेत्रात; प्रतिभेच्या तिसऱ्या डोळ्याचे सृजनसामर्थ्य आहे. नवेकोरे अनुभवविश्व आणि नावीन्यसिद्ध प्रतिमासृष्टीच्या अभिव्यक्तीमुळे ह्या कविता मराठी काव्यरसिकांना पुन्हा मराठी कवितेच्या बैभवाकडे खेचणाऱ्या सिद्ध होतील. आजच्या समकालीन कवितेला लोकाश्रय नाही. ह्या कवितांमुळे मराठी समकालीन कवितेला लोकाश्रय मिळेल अशी अपेक्षा करता येते. आदिवासी कोरकूंच्या जीवनजाणिवांची सौंदर्यासक्त -संपृक्त अभिव्यक्ती कवीने केल्यामुळे, ह्या कविता आशय आणि रूपबंधाची एकात्म जाण निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. कवीचे कलासक्त मन ह्या कवितांमधून आधिक्याने उजळ झाले आहे. कवीच्या नैतिक जीवनजाणिवांचा आणि जीवनाकडे पाहण्याच्या उदारमतवादी, मानवतावादी दृष्टीचा प्रत्यय देणाऱ्या ह्या कविता आहेत. छंदाचे विविध प्रयोग करीत कवीने या संग्रहात सर्वच कविता रचलेल्या आहेत. मांडणी गोळीबंद झाली आहे.

भाषिक रूपं आणि नवनवीन प्रतिमांची निर्मिती झाल्यामुळे कवितांना अंगचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. काव्यमूल्यांचा आविष्कार करतांना कवी काव्यजाणिवेशी -काव्यरचनेशी तडजोड करीत नाही.

कवी जन्माने आदिवासी नसल्याने आदिवासींच्या दैनंदिन जीवनाला त्याला समग्रपणे भिडता आलेले नाही. कवीच्या अनुभवविश्वाला मर्यादा आहेत. अनुभव कमी पडतो म्हणून अभिव्यक्तीलाही मर्यादा येतात. कोरकूंच्या

जीवनातल्या दु:खाचा समग्रलक्ष्यी वेध घेतला जात नाही. कोरकूंच्या दुखऱ्या- शोषित जीवनाचा हा केवळ एक कोपरा आहे. ह्या कवितांमधून सौंदर्यभावनांची निर्मिती आधिक्याने झाली. कोरकूंच्या जीवनातील कुरूपतेला आकार देतांना कवीच्या कलासक्त काव्यमनाचे पारडे जडावल्याचे जाणवते.

ह्या संग्रहातील कवितांना वरीलप्रकारच्या मर्यादा पडत असल्यातरी ह्या कवितांमधून करुणेचा स्वर सातत्याने पाझरला आहे. महाकारुणिक भाव हृदयात निर्माण करणाऱ्या ह्या कविता आहेत. दह्या कवितांमधून करुणेचा डोळा सातत्याने झरझर वाहताना दिसतो. कोरकूंच्या मूक डोळ्यातील कारुण्याची जणू सिपना नदीच काव्यप्रदेशातून वाहताना जाणवते. काव्यरसिकांच्या मनोभूमीत करुणेचा पुरुषार्थ जागवणाऱ्या ह्या कविता आहेत. करुणामूल्याचा प्रातिभ आविष्कार करणाऱ्या ह्या कविता समाजात नैतिक आणि उदारमतवादी मूल्यांची लागवड करणाऱ्या-मूल्यनिष्ठ देशीय कविता आहेत.

__________________समाप्त_______________________


No comments:

Post a Comment