आजच्या मराठी समाजात कबितेविषयी अनास्था दिसून येते. एकीकडे कवितेविषयी कमालीची उदासीनता आणि दुसरीकडे खच्चून कवितेची निर्मिती सुरू आहे. कवितेने आपले काव्यमूल्य हरवले आहे, अशी सर्वसाधारण तक्रार साठोत्तर मराठी कवितेच्या कालखंडात दिसून येते. मराठीत जेव्हापासून मुक्तछंदाचा वापर करण्याची पद्धत रूढ झाली तेव्हापासून कवितेसाठी छंदवृत्त, लय, गेयता, शब्दकळेची अचूक निवड, शैली, काव्यमूल्य वगैरेंची काहीही गरज नाही, असे आमच्या कवींना वाटते. कविता म्हणजे सहज लिहिता येण्यासारखी नैमित्तिक अशी बाब आहे आणि त्याकरिता कोणत्याही अभ्यासाची परिश्रमाची आणि लोकाश्रयाची गरज नाही, अशी कवींची खात्री झालेली दिसते.
मराठी कवितेला मराठी भाषेच्या जन्मापासूनचा इतिहास आहे. मुद्रणाच्या अभावामुळे आणि मौखिक परंपरेमुळे मराठी कविता ही छंदवृत्तातून निर्माण झाली. संतांनी लोकछंदांचा वापर करून मराठी कवितेला समृद्ध केले. युरोपीय कवितेची शैली आणि आशयाची परिमाणे स्वीकारून, भारतीय समाजाला आधुनिकीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न केशवसुतादी कवींनी केल्याचे दिसते. रविकिरण मंडळ, कविपंचक वगैरे मराठीत निर्माण झाले. आधुनिक कवितेनंतर मर्ढेकरांची नवकविता जन्माला आली. मर्ढेकरांनी द्वितीय महायुद्धोत्तर अस्तित्ववादी- एकाकीपणाचे -परात्मतेचे मानवी भान कवितेत जागवले. आशयाच्या आणि रूपाच्या पातळीवर मर्ढकरांच्या कवितेने रेखीव अभिव्यक्तीचा मार्ग स्वीकारला. ओबी, अभंग, पादाकुलक, अश्टक्षरी सारखे छंदवृत्त स्वीकारले. कवितेला देशीय अवकाशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आशयाच्या प्रेरणा युरोपियन असल्यामुळे त्यांच्या कवितेला देशीय पंरपरेशी पूर्णपणे जुळवून घेतांना बरीच कसरत करावी लागली. भाषिक वापरात दुर्बोध प्रतीके आणि प्रतिमांचा आधार घ्यावा लागला. परिणामत: मर्ढेकरी पद्धतीच्या कवितेची आकर्षकता आधुनिकोत्तर कवींना भुरळ पाडून गेली.
साठोत्तर मराठी कविता ही मर्ढेकरांच्या प्रभावात निर्माण झाली. एखादे सुर्वे, महानोर विठ्ठल वाघ, पुरुषोत्तम पाटील अशाही दबावात अपवाद ठरतात. मर्ढेकरांचा प्रभाव हा लघुनियतकालिकवाल्यांच्या कवितांवर ठळकपणे दिसून येतो. आशय आणि मांडणीच्या पातळीवर कवितेला आलेले काठिण्य साठोत्तर कवितेत वाढत गेले. कविता वाचकांपासून दुरावली. देशीय परंपरेपासूनही दुरावली. केशवसुत-मेकर-चित्रे-रेगे अशी परंपरा सांगितली जाते. तुकोबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ आदी कवींच्या देशी असलेल्या कवितेची सलग मांडणी करून कवितेची नीट समीक्षा करण्याचेही टाळले जाते.
कविता ही, समीक्षा आणि वाड्मयीन व्यवहारवादी संस्कृतीवर जगत नाही. कवितेला जोपर्यंत लोकाश्रयमिळत नाही, तोपर्यंत त्या कवितेला अस्तित्वही प्राप्त होत नाही. काळाच्या कसोटीवर खरी कविता नेहमीच जिवंत असते. तुकोबांसारखे कवी आजही जिवंतच आहेत. काळाच्या सीमा भेदूनही कविता जिवंत असते. केवळ कवीला कवितेची ताकद जाणवली पाहिजे. कवितेच्या अस्तित्वाचा लळा लागला पाहिजे. कवितेसाठी आपले सबंध व्यक्तिमत्त्व पणाला लावता आले पाहिजे. कवितेच्या निर्मितीशी नैतिक-प्रामाणिक राहता आले पाहिजे. जाज्वल्य आणि उग्र मनोवृत्तीने कवितेशी एकरूप होता आले पाहिजे. चांगल्या आणि अस्सल कवींजवळच कवितेच्या प्रतिभेचे सामर्थ्य असते. आज कवी भरपूर आहेत. परंतु कविताच गहाळ झाली आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस कवितेची झालेली दुर्दशा कुण्याही काव्यरसिकाला अस्वस्थ करणारी आहे. कवितेच्या ह्या अस्वस्थ-कालखंडाच्या परिप्रेक्ष्यात श्रीकृष्ण राऊतांच्या कवितांचे मूल्यमापन करायचे आहे.
इ. स. १९७८ ते २०२१ ह्या कालखंडात ठळकपणे आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारा कवी कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे तितकेसे सोपे नाही. परंतु ह्या कालखंडातील एकूणच मराठी कवितेत श्रीकृष्ण राऊत यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सतत प्रयोगशील असणारी ह्या कवीची कविता मराठीतल्या दिग्गज मानल्या जाणाऱ्या मौज, अनुष्ट्भ, कविता रती, युगवाणी, हंस, अक्षर, साधना यासारख्या जवळपास सर्वच मुख्य नियतकालिकातून गेल्या त्रेचाळीस वर्षांत प्रकाशित झालेली आहे. शब्दालय प्रकाशनाने त्यांचा गुलाल' (१९८९) हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित केला. 'गुलाल आणि इतर गझला' हा त्यांच्या पहिल्या गझलसंग्रहाचा विस्तार आहे. त्याची पहिली आवृत्ती २००३ मध्ये कवीने स्वतःच प्रकाशित केली आणि दुसरी आवृत्ती अलीकडेच २०२० मध्ये पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. त्यांचा दुसरा गझलसंग्रह “कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा २०१९ मध्ये प्रकशित झाला. याच वर्षी १९० शेरांवर आस्वादात्मक भाष्य करणारा 'गझलाई' हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला. ही दोन्ही पुस्तके नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. गझल हा राऊतांचा जिव्हाळ्याचा लेखनप्रकार आहे.
मराठीत सुरेश भटांनी गझल लोकप्रिय केली. सुरेश भट ते श्रीकृष्ण राऊत हाच गझल या काव्यप्रकाराचा समृद्ध प्रवास होय. गझलनमध्ये ह्या दोन्ही दादा कवींनी आपली पूर्ण प्रतिभा पणाला लावून गझल मराठी कवितेच्या भूमीत रूजवली. एवढी श्रेष्ठ गझल मराठीत दुसऱ्या कुणीही लिहिलेली नाही, हेही नमूद केले पाहिजे. गेल्या त्रेचाळीस वर्षात श्रीकृष्ण राऊतांनी काव्यलेखनात विविध प्रयोग केले आहेत. कवीने आपल्या
काव्यप्रवासात अभिव्यक्ती आणि मांडणीच्या अंगाने ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, बहिणाबाई, बालकवी, मर्ढेकर, ग्रेस,महानोर वगैरे कवींच्या रूपबंधाचा कसून अभ्यास केला. प्रभाव जाणवणार नाही अशा अंगाने काव्यनिर्मितीही केली. आधुनिक युगाच्या विभ्रमांना अभंग ह्या छंदात ताकदीने मांडणाऱ्या कविताही या कवीने लिहिल्या आहेत. 'तुको बादशहा' या कवितासंग्रहातून वाचकांना याची जाणीव झाली. तुकोबांच्या काव्य परंपरेशी नाते सांगत श्रेष्ठ दर्जाची अभंगनिर्मिती कवीने केलेली आहे. तात्पर्य, कवितेच्या अभिव्यक्तीचे निरनिराळे छंद, वृत्ते या कवीने हाताळले. मुक्तछंदातही प्रयोगशीलता आणली. मुक्तछंदातले उपरेपण जसे वसंत आबाजी डहाक्यांनी दूर केले तसेच मुक्तछंदातही शक्ती आणि सामर्थ्य असते, याचा प्रत्यय या कवीच्या मुक्तछंदबद्ध काव्य रचनेवरून येतो.
'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' (२००१) हा कवितासंग्रह त्याचे सशक्त उदाहरण आहे. मराठी रसिकांनी ह्या कवितासंग्रहाची भलावण केली. अनेक पुरस्कारही या संग्रहाच्या निर्मितीसाठी त्यांना मिळाले आहेत. आजचे युग हे जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावाने बाधित झालेले आहे. मानवी जीवनाला वेगवान प्रगतीने संभ्रमित आणि उद्ध्वस्त केले आहे. मानवी नैतिक मूल्येही बदलली आहेत. संपूर्ण मानवी जीवनाला जणू वाळवी लागली आहे. कुटुंबसंस्था आणि समाजव्यवस्थेचीही परिमाणे ढासळली आहेत.
एक जागरूक मन आणि मानवी कळवळ्याचा वसा घेतलेला कवी एकविसाव्या शतकातल्या बदलांकडे कसे पाहतो? या प्रश्नाचे कारुणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न कवीने ह्या काव्यसंग्रहात केलेला आहे. आजच्या नव्या कवींनी जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांना काव्याभिव्यक्तीचा अलंकार चढवला आहे. तो कडवट आणि तीव्र आक्रस्ताळी प्रतिक्रिया म्हणून पाहावा लागतो. परंतु बदलत्या वास्तवाकडे आणि बदलत्या युगाकडे कवीला लिप्त होउन श्रेष्ठ काव्यनिर्मिती करता येणार नाही. कवी हा तटस्थ आणि आशयाशी तादात्म्य पावणारा भाष्यकार असला पाहिजे.
श्रीकृष्ण राऊतांच्या उपरोक्त कविता संग्रहाकडे आजच्या नव्या कवितेचा आदर्श म्हणून पाहावे लागते. नव्या कवींनीही राऊतांच्या समकालीन नवकवितेचे वास्तवरूप समजून घ्यायला हवे. मराठी कवितेच्या प्रगतीची क्षितिजे विस्तारण्याचे मौलिक कार्य राऊतांच्या कवितेने केले आहे. लोकगीतांच्या मुसीतून आलेल्या चार-चार ओळींच्या कवितांचे लोकमानसाला जबर आकर्षण आहे. द्विपदी, दोहा, चौपाई, रुबाई, मुक्तक यांची परंपरा भारतीय वाड्मयात चांगलीच रुजली आहे. ज्ञानेश्वरीच्या लेखनकालापूर्वी जवळपास एक हजार वर्षाआधी महाराष्ट्री प्राकृतात रचलेल्या गाथा आ जही आपल्याला भावतात. गाथा म्हणजे लघुत्तम कविता. 'चार ओळी तुझ्यासाठी' (२००३) हा श्रीकृष्ण राऊत यांचा छोटेखानी कवितासंग्रह. अष्टाक्षरी सारखा लोकछंद, जनसामान्यांची बोलभाषा आणि संयत सूचकता ह्या त्रिगुणांनी या संग्रहातील कवितांना गाथांचा दर्जा दिला आहे.
महाराष्ट्रात मराठी कवितेच्या छंदवृत्तादी आणि काव्यनिर्मितीच्या अंगांचा खोलवर अभ्यास असणारे जे मोजके कवी आहेत, त्यात श्रीकृष्ण राऊतांचा समावेश करावा लागतो. कारण कोणत्याही एका विशिष्ट साच्यात या कवीने आपली कविता घडवली नाही. आशय, मांडणी आणि विचारसरणीच्या कोणत्याही गटाचे सदस्यत्व धारण केले नाही. विविध छंद-वृत्तांचे प्रयोग करून, काळाला जिवंत करण्याचा ह्या कवीचा ध्यास, कवितेविषयीची सजगता, कवितेतील प्रयोगशीलता, जीवनानुभूतीशी असलेले तादात्म्य, आशय आणि अभिव्यक्तीच्या नवीन नवीन शैली घडविण्याची विलक्षण प्रतिभा मराठी कवितेच्या एकूणच परिघात वाखाणण्यासारखी आहे.
तनमनधनाने पाच वर्षे खपून ह्या कवीने कोरकू आदिवासींच्या पारंपरिक मौखिक गीतांचा लोकतत्त्वीय अभ्यास केला. ह्याच विषयावरील संशोधनाबाबत संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाने सन २००६ मध्ये आचार्य पदवीने कवीला सन्मानित केले. मनाने प्रगल्भ परंतु अंगाने पांगळ्या असलेल्या ह्या कवीने कोरकू आदिवासींच्या पाड्यांवर राहून, वेगवेगळ्या पारंपरिक छंदवृत्तांचा प्रयोग करीत, आदिवासी कोरकूंच्या जीवन-वास्तवाला साकार करणाऱ्या कविता लिहिल्या. मेळघाटच्या कविता हा कवितासंग्रह या कवीच्या नवकाव्याभिव्यक्तीचा -नवशैलीचा नवाविष्कार ठरतो. एकूणच मराठी कवितेत वेगळे वळण गिरवणारी ही कविता आहे. मराठी कवितेचे आजचे साचलेपण आणि कृत्रिमता दूर करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून या कवितेकडे पाहावे लागते.
खरेतर साठोत्तर कालखंडात मराठी साहित्यात विविध प्रवाही साहित्याची निर्मिती झाली. ग्रामीण, दलित, आदिवासी असे विविध बहुजनांचे प्रवाह मराठी साहित्यात निर्माण झाले आणि द्या प्रवाहातील लेखक-कवींनी आपली स्वतंत्र भूमीही विकसित केली. आदिवासी कवितेच्या प्रवाहात आजवर भुजंग मेश्राम, वाहारू सोनवणे, बिनायक तुमराम, उषा आत्राम, कुसुम आलाम, कृष्णकुमार चांदेकर, सुनील कुमरे, वामन शेळमाके, माधव सुरकुंडे आदि आदिवासी समाजात जन्मलेल्या कवींनी आपल्या आदिवासी बांधवांचे जीवन वास्तव कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी प्रवाहातील ही कविता बहुतांश फुले-आंबेडकरी दलित काव्यपरंपरेशी नाळ जोडणारी आणि आदिवासी कमी परंतु दलित कवितेशी आधिक्याने तादात्म्य पावलेली दिसते. दलित कवितेप्रमाणेच ह्या कवींच्याही अनुभवक्षेत्राला -विचारक्षेत्राला मर्यादा पडल्याचे दिसते. कवितेच्या विशाल जीवनवादी परिघाचे भान ह्या कवींजवळ नाही. कठोर परिश्रम आणि काव्यसाधनेच्या अभावी काव्यपरंपरांचाही ध्यास हे कवी घेतांना दिसत नाहीत. मर्यादांच्या आणि कलात्मक जाणिवांच्या अभावी ह्या कवींची काव्यनिर्मिती स्वागता ठरत असली तरी अस्सल काव्यनिर्मितीची क्षमता अजूनही आदिवासी कवींनी सिद्ध केल्याचे दिसत नाही. मराठीतील आदिवासी कविता ही दलित कवितेचे उपांग ठरली. आदिवासी जीवनदर्शनापेक्षा ती आक्रोश आणि दलित विद्रोही भावनेचा पुरस्कार करणारी ठरली. कवी हा जन्माने कवी ठरत नाही तर त्याच्या प्रातिभ सामर्थ्याने तो कवी ठरत असतो. अभिनिवेषाच्या ह्या काळात हे भानच आम्ही हरवत चाललो आहोत. कदाचित मराठी कवितेच्या ऱ्हासपर्वांची मीमांसा करतांना ह्या अधोकारकांना टाळता येणार नाही.
केवळ आदिवासी असणे हा काव्यनिर्मितीसाठी आवश्यक गुण नाही. कविता हे सृजनशील आणि प्रतिभेच्या तिसर्या डोळ्यातून पाहिलेल्या जगाचा आविष्कार करण्याचे माध्यम असते. तनमनधनाने आणि बुद्धीनेही कवी असलेल्या माणसाजवळच काव्यसृजनाचे सजग भान असते. कवी असणे महत्त्वाचे ठरते. कवी बनने काव्यनिर्मितीचे भागधेय ठरू शकत नाही. अस्सल अभिजात प्रतिभावंत कवीच केवळ श्रेष्ठ दर्जाचे काव्यसूजन करू शकतो.
काव्यनिर्मिती कोणत्याही प्रवाहातली आणि प्रकारातली असो-कवीचे तादात्म्य आणि त्याची आत्मनिष्ठा काव्यसृजनात प्रभावी घटक असते. प्रतिभेच्या डोळ्यांनी मानवी जगाचे दर्शन घेताना-साक्षात जगताना-कवीच्या मनाच्या मुशीत काव्यानुभूतीची घुसळण सुरू असते. आला अनुभव मांडला तर ते वास्तवाचे प्रत्यक्ष रूप असते. केवळ वास्तवाचे प्रत्यक्ष रूप कवितासदृश्य ओळींच्या उतरंडीत मांडून कधी कविता निर्माण होत नसते. आशय आणि अभिव्यक्ती ह्यांच्या एकजीव तादात्म्यातून -आत्मनिष्ठेतून -प्रतिभा सामर्थ्यांतून कविता निर्माण होत असते. तरीही कवितांची निर्मिती झालीच तर ती कविता ठरत नाही, ती कवितेची अनौरस प्रजा मानली पाहिजे. मूल्यहीन आणि काव्यहीन कवितांची ती निपज असते. अशीच कविता अलिकडे आधिक्याने निर्माण होतांना दिसते. कवी नसलेल्यांच्या मनाच्या विहिरीत केवळ अंधार असतो. कवितेचे शुद्ध पाणी नसते. कवितेचे ते मृगजळ असते. कवितेचे अस्सल पाणी नसते. अद्वितीय प्रतिभेचे लेणे लाभलेले कवीच केवळ श्रेष्ठ दर्जाची काव्यनिर्मिती करू शकतात.
श्रीकृष्ण राऊत ह्या मराठीतल्या प्रयोगशील कवीजवळ असे अस्सल काव्यसृजनाचे प्रातिभ सामर्थ्य आहे. मेळघाटच्या कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आदिवासींविषयीच्या मानवी कळवळ्यातून ह्या कवीची कविता साकार झाली आहे. खरेतर मराठीत शुद्ध आदिवासी जाणिवेची कविता निर्माण करण्याचे प्रथम श्रेय श्रीकृष्ण राऊतांनाच द्यायला हवे.
संग्रहाची मूळ प्रेरणा : डुंडा ओळा पिपल साई
राऊतांनी कोरकू आदिवासी लोकांच्या आदिम दु:खाला काव्यरूप देतांना कोरकू कलाजीवनात वापरली जाणारी आणि त्यांच्या आदिम जीवन दु:खाचे प्रतीक असलेली लोकगीतातली प्रतिमा/प्राक्कथा/मिथक कविता संग्रहाची मूळ प्रेरणा. 'डुंडा ओळा' म्हणजे डुंडा वटवृक्ष. वड हा विशालतेचे प्रतीक. घनदाट सावलीचा धनी. सांस्कृतिक महापुरुषांचा सखासोबती. गावाच्या बाहेरच नव्याने गावात शिरणाऱ्याच्या मनात गूढता आणि भय निर्माण करणारा गाववृक्ष. भुताटकीच्या मिथकांनी प्रसिद्धीला आलेला पुराणभूतवृक्ष.औरस- अनौरसांना एकाच वेळी अंधाराच्या काळ्या सावलीत गडप करणारा संरक्षकवृक्ष. आदिम काळापासून परिसराच्या जीवनाशी समरस झालेला आणि मानवी इतिहासाची साक्ष देणारा साक्षीदार महावृक्ष. परंतु हा पुराणपुरुषवृक्ष डुंडा ओळा आहे. थोटका आहे. जमिनीत घुसणाऱ्याआणि आपली मुळं गावभर पसरविणाऱ्या ह्या वृक्षाच्या मुळांवर घाव घालून ह्या वृक्षाचे नैसर्गिक जगणे अनैसर्गिक केले जाते.
________________ पुढे भाग २ पहा _________________
No comments:
Post a Comment