डॉ. किशोर सानप : भाष्य २


वृक्षाची पानं, फांद्या, मुळ्या छाटल्या जातात. विशाल आणि महाकाय असलेला हा पुराणपुरुष गावपुरुष गावाच्या डुंडेपणाचे -थोटकेपणाचे-अनैसर्गिकतेचे -घाव आणि दु:खांचे दर्शन घडवितो. वड आणि पिंपळ हे तसे कुठल्याही भूमीत -जमिनीत-जागेत उगवणारे. आणि अफाटपणे विस्तारणारे वृक्ष आहेत. मानवी जीवनात हे वृक्ष अन्नदाते नसले तरी मानबी जीवनाला संरक्षण देणारे-सावली देणारे -दु:खाचा गडद अंधार दूर करणारे अमृतवृक्ष आहेत. माणसाला हे वृक्ष निरूपद्रवी वाटतात. परंतु गावातल्या आणि आदिवासी ढाण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना मात्र हे वृक्ष आपले महापूर्वज -वंशज -देववृक्ष वाटतात. कोरकू आदिवासींना म्हणूनच वडा-पिंपळाच्या सावलीचा मोठा आधार वाटतो.

'डंडा ओळा पिपल साई आयोम

लाखो बंजरा कोनखे अदिरे... '

नवरीला घेऊन नवरदेव घरी येतो. नवरदेवाची आई म्हणते, ये बेटा आपल्या घराच्या सावलीत बैस. तू दूरून आलीस. थकली असशील. डुंडा वडाच्या आणि पिंपळाच्या सावलीप्रमाणे तुला मायबापाची सावली मिळालेली आहे. तू चिंता- काळजी करू नकोस... हा आशय आहे उपरोक्त कोरकू लोकगीताचा! इुंडा-थोटक्या वडाची प्रतिमा ही कोरकूंच्या सनातन दु:खाची अन्वर्थक प्रतिमा आहे. जीवन दु:खद आहे आणि संघर्ष हा दु:खावरील उतारा असला तरी आपल्या भाषेतलं -संस्कृतीतलं जगण्याचं संचित ह्या लोकांनी आदिम काळापासून स्वीकारलेलं आहे. महावृक्ष असलेला वड हा कोरकूंसाठी थोटका -कापलेला-पराधीन-परका-पोरका-कुणीही त्याच्यावर घाव करावा आणि त्याने निमूटपणे तो सहन करावा असा आहे. कोरकूंनी इुंडा ओळा ह्या दोन शब्दांची रचना करून आपल्या सनातन दु:खाला चिरंतन कलारूप दिलेलं आहे. वड-पिंपळ अशा टाकाऊ निरूपद्रवी वृक्षांनाही कोरकूंच्या कलाजीवनात मौलिक स्थान असते.

कोरकूंच्या कला म्हणजे त्यांच्या जीवनाचं वास्तव रूप असतं. कलेच्या निर्मितीसाठी त्यांना काहीही करावं लागत नाही. कोरकूंच्या कला म्हणूनच अपौरूषेय आहेत; त्या लौकिक जीवनानुभवाच्या अलौकिक अभिव्यक्तीमुळे. अशाच अन्वर्थक आणि कारुणिक प्रतिमांनी कोरकूंची लोकगीतं कलेचा समृद्ध वारसा गिरवणारी आहेत. मराठीत कोरकूंच्या कलाप्रकारांना आणि कलाखूपांना काव्यात साकार करण्याची किमया राऊतांनी ह्या संग्रहातून सिद्ध केली आहे.

कोरकू : वंश-संस्कृती-भाषा आणि जीवनरूप

कोर म्हणजे माणूस आणि कोरकू म्हणजे माणसं. माणसांचा समूह. कोरकू ही आदिवासी जमात. कोरकू ही मुंडा उर्फ कोलवंशीय वन्य जमात आहे. सातपुड्याच्या कुशीत विसावलेली ही कोरकू आदिवासी लोकांची वन्य जमात.महाराष्ट्रात मेळघाट -चिखलदरा-धारणी ह्या अमरावती जिल्ह्यात तर छत्तीसगड -मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद-निमाड छिंदवाडा-बैतूल ह्या परिसरात आदिम जीवन जगणाऱ्या कोरकूंची वस्ती आहे. सन्‌ २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र (२६४४९२) आणि मध्यप्रदेशातील (७३०८४७) कोरकूंची एकूण जनसंख्या ९९५३९९ आहे. कोरकू हे प्रोटो ऑस्ट्रलॉइड वंशाचे लोक असून त्यांची भाषा ही ऑस्ट्रीक भाषा समुहातील भाषा आहे. कोरकूंची संस्कृती आदिम असून ह्या लोकांचे मानवी जीवन अस्थिर असते. विज्ञानाचा आधार नसतो. त्यांच्या भाषेला लिपी नसल्यामुळे ग्रंथप्रामाण्यही त्यांना ठाऊक नसते. निसर्गाशी एकरूप होवून जगण्याची शिकस्त हे लोक करतात. मानसविश्‍वात आणि बाह्मयविश्‍वात शहरी प्रदूषण नसते. जीवनाचे आदिम आणि निर्व्याज संस्कृतिरूप जपण्यावर त्यांचा भर असतो.

कोरकू आदिवासी लोक टोळ्यांनी जंगलात राहणारे होते. इंग्रज सरकारनं जंगल कायदा करून त्यांच्या नैसर्गिक जीवनाला हादरा दिला. कोरकू जंगलनिकाला झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने व्याप्र प्रकल्प, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने निर्माण करून पुन्हा कोरकूंची जंगलातून हकालपट्टी केली. कोरकूंचे जंगलातून स्थलांतर झाल्यामुळे ते मोलमजूरी करण्यासाठी शहराकडे वळले. अनेक कोरकू कुटुंबे जंगलात दूरवर लपून बसली. आपल्याच भूमीवरून निष्कासित झालेल्या ह्या जमातीला पुढे जंगली अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या आर्थिक आणि लैंगिक शोषणाला बळी पडावे लागले. कोरकूंचे नैसर्गिक जीवन कालांतराने हरवले आणि शहरी प्रदूषित जीवनात सर्व बाजूंनी होणाऱ्या शोषणाने कोरकू हतबल झाला. कोरकूंच्या आदिम संस्कृतीवरही कालांतराने जांगडी (नागरी) आधघातांचा दूरगामी परिणाम झाला. कोरकूंच्या कला, भाषा, संस्कृती, नैसर्गिकता, सहजता त्यामुळे बाधीत झाली. एवढे भयावह

परिणाम होऊन सुद्धा कोरकू लोक समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहात, आज ज्याला आपण ग्लोबल व्हिलेजचे जग म्हणतो, त्या जागतिकीकरण -आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाने प्रगत जगात पोहोचलेले नाहीत. आजही ते आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक विश्वात स्वप्नस्थ आहेत. आपल्या कलाप्रकारांचा उपयोग करीत, जीवनातलं सौंदर्य शोधण्यात मश्गुल आहेत. जांगड्यांचा दु:स्वास ते करतात परंतु जांगड्यांना कमालीचे भीतातही. कारण जांगड्यांच्या शोषणाचा विरोध करण्याचे बौद्धिक आणि मानसिक सामर्थ्य त्यांच्याजवळ आजही नाही.

जांगड्यांच्या ह्या प्रागतिक युगात कोरकू पोरका, परात्म, अस्वस्थ, दिशाहीन, निर्वासिताचे यातनामय जीवन जगत आहे. आजही आपल्या सांस्कृतिक अंधश्रद्धांच्या वर्तुळात भूमकाबाबांचा त्यांना आधार वाटतो. आपले सर्वच सणउत्सव ते वर्षभर खपून प्रसंगी सावकाराचे उंबरठे झिजवून साजरे करतात. मोहाची शिडू आणि नदीतली मासळी त्यांच्यासाठी परमोच्च आनंदाचा ठेवा असतो. पोटाची खळगी बुजविण्यासाठी आदिम काळापासून संघर्षरत असलेली जी आदिम जमात आजही सर्वहारा आणि उपेक्षित-शोषित आहे. बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्लासारखे नेतृत्व ह्या जमातीला मिळाले नाही म्हणून अंधाराच्या डोहात भयभितपणे जीवनाचा शोध घेत, जंगलात लपतछपत, ही जमात जगतांना दिसते. कोरकूंच्या जीवनातलं थरारक दु:ख आणि त्यांच्या वाट्याला आलेलं प्रवाहपतित्व-अमानुष जीवन दर्शन श्रीकृष्ण राऊतांनी मेळघाटच्या कविता या अन्वर्थक आणि नव्या कोऱ्या, महाकारुणिक आविष्कार करणाऱ्या कवितांमधून मांडले आहे. जगण्याशी दोन हात करतांना वाट्याला येणारे थरारक दु:ख, ह्या कवीने शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

आदिवासी भावनांना 

लेउदे मा लोकधाटी

कोरकू आदिवासी असले तरी त्यांच्या भावना ह्या उपजतच स्वाभाविक आणि निरागस असतात. मराठीतली लोकगीते आणि आदिवासींची लोकगीते यांचा अनुबंध भिन्नच असणार. तरी कोरकू लोकगीतांचा विचार हा कोरकूंच्या जीवन जाणिवांच्या सांस्कृतिक संदर्भातच करावा लागतो. राऊतांनी ह्याचे भान ठेवले आहे. त्यांनी कोरकूंचं जीवनदर्शन घडवताना कोरकूंची कोरकू भाषा आणि मराठीतील पारंपरिक छंद-वृत्तांचा वापर करून कवितांची आखीवरेखीव जडणघडण केली आहे. कवितेचा घाट सांभाळतांना त्यांनी कोरकूंच्या जीवनशैलीला जराही धक्का लागू दिला नाही. कोरकूंचं वास्तव जीवन, कोरकूंच्या व्यथा-वेदना, त्यांचे अनुभवविश्व यांचा कविमनाने कारुणिक परिघात विचार केला आहे. कवितांची आशयात्म आणि रचनाशैलीची संहितात्मक मांडणी केली आहे. त्यातून सिद्ध झालेला मेळघाटच्या कविता' हा काव्यसंग्रह मराठी कवितेच्या कक्षा रुंदावणारा झाला आहे. मराठी कवितेपेक्षा कवीला लोकगीतांचा लळा अधिक. मराठी आणि कोरकू लोकगीतांच्या साधनेतून त्यांची ही कोरकू काव्यजाणीव विकसित झाली. कवितेच्या देवीला ते म्हणतात, आदिवासी भावनांना 'लोकधाटीचे लेणे लेऊ दे मा... ' अशी प्रार्थना केवळ अभिजात प्रतिभेचे सामर्थ्य लाभलेला कवीच करू शकतो. मराठी कबितेला नव्या जीवनानुभूतीचा त्यांनी परिचय करून दिला. आपल्याच मानवजातीतली आदिम जमात किती बिकट जीवन जगत आहे, याची खोलवर जाणीव करून दिली. “मेळघाटच्या कविता' म्हणूनच कवीच्या नैतिकतेचा आणि कलात्मक भानाचा महाकारुणिक आणि प्रातिभ आविष्कार ठरतो.

आशयाच्या डोहात उतरताना...

मेळघाटच्या कविता' या काव्यसंग्रहात एकूण ४१ कवितांचा समावेश आहे. ह्या सर्व कविता निरनिराळ्या अभिजात आक्षरछंदात रचलेल्या आहेत. कवितेचा आशय स्वत:चा रूपबंध घेऊन अवतरतो. पहिलीच कविता “वरुणा! वरुणा!' आर्त करुणेचं गीत गाणारी षडाक्षरी शुद्धसती' छंदातली कविता आहे. कोरकूंच्या कलाप्रकारात गाण्याला नाचण्याला अनन्यसाधारण स्थान असते. जीवनातलं सारं दु:ख रात्री फेर धरून नाचतांना-गातांना विसरलं जातं. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी आणि सृष्टीच्या सृजनाला आबाद करण्यासाठी कोरकू लोक वरुणाला प्रार्थना करतात. वरुण प्रसन्न झाला तरच पाऊस बरसणार. शेती पिकणार. रोजगार मिळणार. जीवनाचं गणित जुळेल. अनुभव असा असतो की वरुण लवकर प्रसन्न होत नाही. अवर्षण आणि दुष्काळात मानवी सृष्टी होरपळून निघते. कोरकू म्हणूनच श्रद्धेने वरुणा! वरुणा! तुझ्या डोळ्यातून झरू दे करुणा! झरू दे करुणा! असं म्हणतात. वरुणाचा पाऊस हा करुणेचा पाऊस असतो. गाईच्या पोटाला चारा मिळाला तरच चिमण्या लेकरांच्या ओठांना दूध मिळेल. साऱ्या मानव-मानवेतर सृष्टीच्या पोटाची भूक वरुणाच्या करुणा वर्षावाने भागणार असते.

कोरकू आपलं लहानसं जीवन आणि त्यातले सणवार साजरे करताना माफकच अपेक्षापूर्तीची स्वप्न पाहतात. मुंगीच्या सणाला सांडू दे साखर असं मुंगीचं लहानपण त्यांनी स्वीकारलेलं असतं. पावसाची चाहुल लागताच, कोरकूंना पेर्तेव्हाचा संदेश देणारा पक्षी हा गुराढोरांच्या खुरांत साचलेलं पाणी पितो असा कोरकूंचा लोकसंकेत. पेर्तेव्हाला आपली तहान भागवता आली पाहिजे म्हणून प्रथम तू बरस आणि तहानेचे बुंद खुरात साचू दे. झाडाझुडांच्या मुळांना पाणी मिळू दे. पक्षी आणि वृक्ष यांच्या आनंदात विभोर होण्याची भावना थेट तुकोबांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे-या मानवेतर सृष्टीशी तादात्म्य पावण्याची थोर जाणीव करून देते. कोरकू आधी मानवेतर सृष्टीच्या तृष्णेला-सृजनाला अग्रक्रम देतात आणि नंतरच आपल्यासाठी वरुणाला बिनवणी करतात. शेवटी, वरुणा! वरुणा! तुझ्या डोळ्यातून झरू दे करुणा! झरू दे करुणा! अशी आर्त हाक ते वरुणदेवाला देतात. परंतु वरुणदेवालाही बिचाऱ्या कोरकूंची प्रार्थना ऐकूच येत नाही. कोरकूंच्या प्रार्थनेतील कारुण्य कवीने समर्थपणे व्यक्त केले आहे.

पंचाक्षरी 'आन्दोलन' छंदातील . 'जो जो रे ऽ बाळा ss जो ऽ' या कवितेने कोरकूंच्या आदिम काळापासून सुरू असलेल्या उपासमारीचा सूर आळवला आहे. कोरकू माय रानावनात मोलमजुरीसाठी जातांना आपल्या लेकराला पाळण्यात झोपवते. मुलाचा आक्रोश सुरू असतो, परंतु कोरकू माता मुलाला दूध पाजू शकत नाही. तिलाच नीट खायला मिळत नसल्यामुळे अंगावरच दुधाचा थेंब थांबत नाही. मग एकच त्यावर उतारा असतो. मुलाला अफू चारून त्याला निजवणं आणि कामाला जाणं. मधल्या अवकाशात ती आपलं हे असह्य दु:ख विसरण्यासाठी अंगाई गीत म्हणते. ह्या अंगाई गीतात कवीने निर्माण केलेला उपहास तर कुण्याही माणसाच्या हृदयालाच पाझर फोडणारा आहे.

जीवनातलं वास्तव कोरकू मायनं स्वीकारलेलं असतं. पोटाला पालू बांधून मायबाप रानावनात कामासाठी जातात. कधी मजुरी मिळते तर कधी जंगलातलं सोनं मातीमोल विकून पैका मिळतो. कधी आठ आठ दिवस काहीही मिळत नाही. मिळालं तर ठेकेदार- अधिकारी लुटून नेतात. धाक दाखवून कोरकूंना कुणीही ओरबाडतो. जांगड्यांना कमालीची घाबरणारी ही जमात शोषणही निमूटपणेच सहन करते. अबोल बेटासारखे हे लोक असतात. महिना महिना उपासमार चालते. चूल पेटत नाही आणि पोटाच्या यज्ञात अन्न-समिधा पडत नाहीत. पावसाचा बहर कधी कधी हिना महिना उरकत नाही. पूर-झड-उपासमार-कुपोषण-आजारानं कोरकू आणि त्यांची मुलं मुंग्यांसारखी मरू लागतात.

कोदो, मोहाचं कूट, कुटकी, ज्वारी हे कोरकूंचं खाद्यान्न. पावसाळ्यासाठी लावून ठेवलेलं धान्य संपतं परंतु पाऊस थांबत नाही. शेवटी रोटीला लावण्यासाठी मीठही मिळत नाही. रोटी आणि हातातोंडाची गाठभेट होत नाही. संततधार झरणाऱ्या झोपडीत कुडकुडणाऱ्या उघड्यानागड्या कोरकूंच्या पोटात भूकेचा उठलेला वणवा थुंकी गिळून विझवावा लागतो. कोरकूंना आपल्या पोटाची भूक शुद्धीवर ठेवते परंतु भूकेने तडफडणार्‍या लेकराची सूद गेल्याचे पाहून त्यांचं मन तिळतिळ तुटतं. पोटाची भूक आवरता येत नाही म्हणून कोरकू घरातला चिखलही खातात. प्रदूषित पाणी पितात. परिणामत: लहान मुलांची पोटं कुपोषणानं फुगतात आणि काही दिवसातच त्यांच्या पोटाच्या फुग्यातली हवा, मृत्यू काढून घेतो. कोरकू मुलांच्या जन्म-मृत्यूचा प्रवास कधी दोन वर्षांचा असतो. कधी दोन दिवसांचा असतो. कधी दोन श्वासांचा असतो.

'एकादशाक्षरी परिलीना' छंदातली “डोंगर देवाचं उघडं धन' ही कविता. “डोंगर देवाचं उघडं धन' ही प्रतिमा वरवर सौंदर्याचा निर्देश करणारी असली तरी दह्या सुंदर आणि नैसर्गिक डोंगरदेवाचं उघडं धन, मूळ मालक असलेल्या कोरकूंना मिळत नाही. त्याच्या मालकीचं हे डोंगरधन सरकारनं आणि जांगड्यांनी तर लुटून नेलंच आहे. परंतु डोंगरधनाचा उपभोग घेणारे अस्वल-वाघ यांनीही कोरकूंच्या जंगलधनावर आयता ताव मारलेला असतो. डोंगरदेवानं आपल्या कोरकू लेकरांना मुक्त हस्ताने जंगलाचं धन दिलेलं असतं. नदीनाल्याच्या काठानं मोहाचं बन असतं. कोरकूंना मोहाची शिडू (दारू) अतिशय आवडणारी. सारे कोरकू मोहाच्या शिडूसाठी जीव ओवाळणारे.

घरातल्या बायका पहाटेच्या धूसर अंधारात मोहबनात मोहफुलं वेचायला जातात. कमरेला टोपलं-पाटी-फडकं बांधतात. मोहानं रात्री बरसून भूमीला झिंगवलेलं असतं. झिंगण्याला नादावलेलं रिचि-अस्वल मात्र बायकांच्या मागावर लपून बसलेलं असतं. अचानक आक्रमण करून जबडाच फाडणाऱ्या ह्या केसाळ जनावराला कोरकू घाबरतात. अस्वलाची गाठभेट झाली की काळ्या अंधारात हे काळं अस्वल बायकांना नासवतं आणि मारून टाकतं. सारं रान पहाटेपर्यंत मोहफुलांच्या वासानं-नादानं झिंगतं आणि पहाटेला सारा परिसर सावज टिपण्यासाठी सज्ज झालेला असतो. मोटार हाणणारा जांगडीही कोरकू बायांसाठी जंगली अस्वलच असतो. 'नदीच्या काठानं सागाचं बन, साजरी बायको लोकांचं धन' ह्या लोकगीताची आठवण करून देणारी ही कविता आहे. लोकगीताची उंची गाठतांना -मोहफुलांनी नादावलेल्या रानातल्या प्रतिमांना, आशय-शैलीची उंची देत कवीने कोरकूंच्या जीवनातलं उघडंनागडं जिवंत वास्तव सुद्धा कलात्मक उंचीवर नेलं आहे.

'मोठ्याच्या घरी' या कवितेत कवीने जांगड्यांच्या जंगल सफारीचं रहस्य सांगितलं आहे. 'निर्झरगीत' छंदातल्या ह्या कवितेत केवळ पाच अक्षरांच्या रचनाशैलीने हजारो वर्षांपासून जंगलात मौजमजा-शिकारी करणाऱ्या सरंजाम मनोवृत्तीच्या-जांगडी लोकांच्या हवाबदलाच्या -कृत्रिम जीवनशैलीचा उपहास करीत, कोरकूंच्या मनात जांगड्यांची वसलेली भीती रानपरिसरातल्या प्रतिमांचा वापर करून व्यक्त केली आहे. जंगल हे खरेतर आदिम लोकांचे मूळ निवास स्थान. ह्यांचं रानातलं असं हिंस्त्र -अहिंस्त्र प्राण्यांसह -वृक्षवेलींसहचं स्वतंत्र विश्व. ह्या विश्वात त्यांना बाहेरचं कुणीही चालत नाही. बाहेरचं कुणी केवळ आपलं जीवन कुस्करण्यासाठीच येत असतो; अशी त्यांची धारणा असते.

__________________पुढे भाग ३ पहा ________________

No comments:

Post a Comment