उगवली बाई

 उगवली बाई


उगवली बाई

सुकाची चांदणी;

उघड पापणी.


तव्यावर थाप

काटी-कुटी जळे;

झोपडी उजळे.


सुटला वारा

अंग हुशारले;

रातकिडा बोले.


चुंबळीत विळा

झप्प झप्प पुढे:

वार मागं पडे.


सुनी आडवाट

रुखी-सुखी झाडं;

बोडका पहाड.


वाळली कण्णक

तुटे डांग-डुंग;

रठ हातासंग.


नाल्या-खोल्यातून

काडी-कुडी गोळा;

वाजतो पाचोळा.


वासनचा वेल

घेई अडसून;

काड्यांना रचून.


वैशाखाचं ऊन

डोईवर मोळी;

भिजते काचोळी.


भारी झाला श्वास;

लप्प झप्प पाय

हेलकावे खाय.


मान गळू आली,

घसा कोरडला;

झिरा सापडला.


गटगट पाणी,

पदराला घाम;

जिवाला आराम.


सूर्यदेवा तुला

चढण्याची घाई:

जीव लाही-लाही.


रप्पकन पडे

अंगणात मोळी:

चिमे फुलकळी.

No comments:

Post a Comment